अर्थसंकल्पातून दिलासा : पीजे मार्ग ब्रॉडगेज होण्यासाठी सर्वेक्षण : इंदोर-मनमाड-मालेगाव मार्गासाठी 50 कोटी मंजूर
भुसावळ- भुसावळ-जळगाव दरम्यानच्या थर्ड व फोर्थ लाईनसाठी निधी मंजुरीसह पीजे मार्गाचे मलकापूरपर्यंत ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरीसह बहुप्रतीक्षीत इंदोर-मनमाड-मालेगाव रेल्वे मार्गासाठी 49 कोटी 84 लाख रुपये नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी आता पूर्ण झाल्याने खान्देशवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाल्याने भुसावळ विभागात अनेक कामांना आता चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
थर्ड व फोर्थ लाईनीसाठी मिळाला निधी
जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी अनुक्रमे 10 व 50 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय अमरावती-नरखेड मार्गासाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला असून पुणे-नाशिक दरम्यान 265 किलोमीटरच्या मार्गासाठी सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे तसेच पाचोरा-जामनेर मार्गाचे मलकापूरपर्यंत विस्तारीकरण करून हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत होण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. त्या शिवाय धुळे-बोरविहिर-नरडाणा मार्गासह, दौंड-मनमाड, वर्धा-नागपूर (चौथ्या लाईनीसाठी) तसेच भुसावळ-वर्धा थर्ड लाईनसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने मिळाल्या सुविधा
भुसावळ-वरणगाव दरम्यान आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत होणार असून फुलगाव येथील गेट क्रमांक 80 वर आरओबीसाठी सर्वे होईल. भुसावळ येथे मुंबई एण्डला (जुन्या सातारा पुलाजवळ) पूल मंजूर करण्यात आला आहे. आचेगाव-बोदवड दरम्यान दोन्ही दिशांना मध्यवर्ती ठिकाणी ब्लॉक खंडसाठी सर्वेला मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय म्हसावद येथे गेट क्रमांक 144 तसेच जळगाव येथे गेट क्रमांक 147 वर आरओबीसाठी सर्वेला मंजुरी मिळाली आहे. ईगतपुरी-भुसावळ दरम्यान 14 पुलांचा सर्वे तसेच नाशिक येथील आरपीएफ प्रशिक्षण केंद्र स्थलांतराबाबत सर्वे, भुसावळ झेडटीसीत छात्रवासाबाबत सर्वे, भुसावळातील व्हील प्रेसबाबत सर्वेला मंजुरी देण्यात आली आहे.