खाकीतील ‘दबंग’गिरीमुळे गुन्हेगारांची वाढली हिंमत
भुसावळ (गणेश वाघ)- शांतताप्रिय व कॉस्मोपॉलिटीन शहर अशी ओळख असलेल्या भुसावळ शहराला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. कधी काळी दोन कुटुंबातील वैमनस्यामुळे थेट बसमधील आरोपीवर तर साक्षीला आलेल्या साक्षीदारावरच न्यायालयाबाहेर धडाधड गोळ्या चालल्याचा इतिहास डोळ्यापुढे असताना तत्कालीन पोलिस उपअधीक्षक रोहिदास पवार, त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर बर्यापैकी नियंत्रण मिळाले, गुन्हेगारदेखील कायद्याच्या बडग्यामुळे दोन पाऊल मागे सरकले मात्र गेल्या काही महिन्यांचा इतिहास पाहता शहरात गुन्हेगारांचीही हिंमत वाढली आहे. शहर हद्दीत गेल्या पंधरवड्यात तब्बल चार खुनाच्या घटना घडल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे ? असा प्रश्न विचारण्यास वाव आहे.
पंधरा दिवसात तब्बल चौघांचा खून
मित्राच्या बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधातून वाद उफाळल्याने शहरातील आनंद नगरातील रहिवासी असलेल्या जय अशोककुमार दुधाणी (18) या तरुणावर दत्तू जयसिंग राजपूत व निलेश चंद्रकांत ठाकूर या संशयीतांनी डी.एस.ग्राऊंडवरील मैदानात पार्टीतच वाद घालून त्याच्यावर चाकूने तब्बल 14 वार केल्याची घटना रविवार, 24 मार्च रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर जय दुधाणीवर गोदावरीत उपचार सुरू असताना सहाव्या दिवशी शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच रेल्वेच्या दहा बंगला भागातील कालिवाडी मंदिरासमोरील डी.368 मधील रहिवासी व रेल्वेत कर्मचारी असलेले याकूब डॅनियल जॉर्ज (37) यांच्यावर सोमवार, 8 एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला होता तर या प्रकरएणी बॉबीसिंग विरेंद्रसिंग ठाकूर (44) या मयताच्या चुलत शालकास अटक करण्यात आली होती. जॉर्ज यांचे उपचार सुरू असतानाच त्यांचीही काही दिवसांनी प्राणज्योत मालवल्याने या प्रकरणी खुनाचे कलम वाढवण्यात आले होते. दोन खुनांच्या घटना विस्मरणात जात नाही तोच रविवारचा दिवस दोन खुनांमुळे गाजला. अनैतिक संबंधातून रेल्वेच्या झेडआरटीआय परीसरात सरला अशोक भांडारकर (60, रा.अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) या वृद्धेचा खून करण्यात आला तर या घटनेच्या अवघ्या काही तासानंतर शहरातील लोणारी मंगल कार्यालयाजवळील पूर्व हुडको भागाजवळील रहिवासी प्रीती ओंकार बांगर (22) या तरुणीचा एकतर्फी प्रेमाच्या कारणातून संशयीत आरोपी प्रवीण विष्णू इंगळे (27, राहुल नगर, भुसावळ) याने खून केला.
पोलिसांची ‘दबंग’गिरी चर्चेत
‘कायद्यापुढे सर्व समान’ या ब्रीदनेच पोलिसांची कार्यपद्धत्ती असायला हवी मात्र बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी योगेश माळी आणि शशी तायडे यांना या ब्रीदचा बहुधा विसर पडल्यानेच त्यांनी मद्यधूंद अवस्थेत काही एक कारण नसताना जुबेरखान नईम खान पठाण (33, ग्रीन पार्क, भुसावळ) या तरुणाला रविवार, 7 एप्रिल रोजी रात्री 12.15 वाजता रेल्वे स्थानकाबाहेरच फाईटने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला तर तक्रारदाराने बाजारपेठ पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांविरुद्ध तक्रार असल्याने ती दाखल होते वा नाही? याकडे लक्ष लागून असताना कर्तव्यदक्ष निरीक्षक देविदास पवार यांनी ‘कायद्यापुढे सर्वांना एकसमान न्याय’ हा निकष लागू करीत कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केल्याने त्यांच्यावर समाजमनातून कौतुकाचा वर्षाव तर झालाच शिवाय पोलिस दलात असेही शिस्तप्रिय अधिकारी असल्याचा संदेशही गेला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या कर्मचार्यांचे निलंबन करून कायदा मोडणार्या पोलिसांमध्ये खळबळउ
भुसावळातील गुन्हेगारी ठेचण्याची गरज
पोलिस देखील माणुस असून त्यांच्याकडे गुन्हा रोखण्यासाठी जादूची कांडी नाही ही बाब तितकीच खरी असलीतरी कायदा हातात घेणार्यांवर कायद्याची लाठी पडायला हवी, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. गुन्हेगारांना वेळीच ठेचायला हवे अन्यथा भुसावळ शहराचे बिहार होण्यास वेळ लागणार नाही, हेदेखील तितकेच खरे ! चोर्या, घरफोड्यांचा तपास शून्य असून पोलिसांची गस्त नावालाच होत आहे तर दुसरीकडे खून, चाकूहल्ला, हाणामार्या या घटना जणू नागरीकांच्या अंगवळणी पडल्या आहेत हे सर्व रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आपले अस्तित्व दाखवण्याची निश्चित गरज आहे.