भुसावळ तहसील कार्यालयातून वाळूचा डंपर लांबवला

Bullying of sand mafia increased: Sand dumper was removed from Bhusawal Tahsil Office भुसावळ : शहरातील तहसील कार्यालयात अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारा डंपर जप्त करण्यात आला होता मात्र दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी संशयीताने तहसील आवारातून डंपर लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डंपर मालक राहुल सुकलाल भोई (25, भोईवाडा, भुसावळ) यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात वाळू माफियांची दादागिरी वाढली असून महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही यानिमित्त प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहर पोलिसात डंपर मालकाविरोधात गुन्हा
महसूल प्रशासनाने दोन ब्रास वाळूने भरलेला डंपर (एम.एच.19 झेड.4847) हा बुधवार, 7 डिसेंबर रोजी रात्री जप्त करीत डंपर मालक राहुल भोई यांना 45 हजार 770 रुपये दंडाची नोटीस बजावली होती मात्र दंड भरणे टाळण्यासाठी संशयीत राहुल भोई यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून तीन लाख रुपये किंमतीचा डंपर व त्यातील चार हजार 457 रुपये किंमतीची वाळू चोरी केल्याने (डंपर पळवून नेल्याने) या प्रकरणी तहसील कर्मचारी रजनी शंकर तायडे (54, वरणगाव रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक समाधान पाटील करीत आहेत. दरम्यान, महिनाभराच्या आत तिसर्‍यांदा तहसील आवारातून डंपर पळवून नेल्याची बाब उघडकीस आल्याने महसूल प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.