भुसावळ तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रशासनाला साकडे

0

आमदार संजय सावकारेंसह जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन

भुसावळ- भुसावळ तालुक्यात सरासरीपेक्षा अवघे 49 टक्के पर्जन्यमान झाल्याने गुरांच्या चार्‍यासह पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून अनेक गावांना अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याने भुसावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार संजय सावकारे, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचासह शेतकर्‍यांनी स्थानिक तहसीलदार प्रशासनाकडे मंगळवारी केली. आमदार सावकारे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनाही साकडे घातले आहे.

आमदारांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे साकडे
आमदार संजय सावकारे यांनी मंगळवार, 18 रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेत त्यांना भुसावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तालुक्यात सरासरीच्या 49 टक्के पर्जन्यमान झाल्याने पीक परिस्थिती अत्यंत नाजूक असून कोरडवाहू पिके नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चार्‍याचीदेखील टंचाई असून भविश्यात गंभीर समस्या निर्माण होणार असल्याने आतापासून तातडीच्या उपाययोजना कराव्यात तसेच तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली.

तालुक्यातील सरपंच एकवटले : प्रशासनाला निवेदन
भुसावळ तालुक्यातील सरपंचांनी एकत्र येत आमदार सावकारे, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांच्या नेतृत्वात मंगळवारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात तालुका दुष्काळी जाहीर करण्यासंदर्भात निवेदन दिले. प्रशासनाने तालुक्यात सरासरीच्या 49.8 टक्के पाऊस पडल्याचे सांगितले असलेतरी सरासरीच्या 35 टक्केदेखील पाऊस झालेला नाही. असे असताना महसूल विभागाने 61 टक्के नजर आणेवारी घोषित केल्याने ही बाब संतापजनक आहे. महसूल विभागाने सर्व सरपंचांना सोबत घेवून पाहणी करावी व नंतर आणेवारी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यात चार्‍यासह पिण्याच्या पाण्याचे संकट आगामी काळात उद्भवण्याची भीती असून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
तहसील प्रशासनाला निवेदन देतेसमयी बेलव्हाय सरपंच मनीषा खाचणे, पिंपळगावचे बाबूराव सरोदे, किन्हीच्या हर्षा येवले, सुनसगावचे दीपक सावकारे, पिंपळगावचे निवृत्ती पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील महाजन, वैशाली पाटील, विजय पाटील, शिवाजी नावरे, शशीकांत पाटील, किरण पाटील, वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील, खडका सरपंच पद्माबाई पाटील, खडका ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन, कन्हाळे बु.॥ सरपंच राजेंद्र पाटील, पंकज पाटील, सुभाष कोळी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, साकेगावचे माणिक पाटील, संजय पटवे, हतनूर सरपंच निता इंगळे, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, फेकरीचे प्रशांत निकम, देवसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती.