भुसावळ तालुक्यातील चार गावांचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून ठप्प

0

ओडीए योजनेवरील विजेच्या थकबाकीमुळे करण्यात वीजपुरवठा खंडित

भुसावळ- तीन कोटी 32 लाख रुपयांची थकबाकी झाल्याने वीज वितरण कंपनीने ओडीए योजनेवरील वीजपुरवठा 4 सप्टेंबरपासून खंडीत केल्यामुळे भुसावळ व बोदवड तालुक्यातील 33 गावांचा पाणीपुरवठा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यात भुसावळ तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. यामुळे ग्रामस्थांना शेत-शिवाराची कामे सांभाळून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ओडीएच्या पुर्णा नदीवरील हेड वर्ककडे जुलै 2018 ची दोन कोटी 31 लाख 35 हजार, सारोळा केंद्र 88 लाख, तळवेल 13 लाख अशी एकूण तीन कोटी 32 लाख 35 हजार रुपये वीज बिल थकबाकी आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने 4 सप्टेंबरपासून योजनेवरील वीजपुरवठा खंडीत केला आहे तसेच थकीत वीज बिलाची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असा पवित्रा वीज वितरण कंपनीने घेतला आहे. यामुळे योजनेवरील पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांना शेत-शिवारातील विहिरीवरून पाणी आणून आपली गरज भागवावी लागत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील या गावांमध्ये पाण्याची टंचाई
ओडीए योजनेवर अवलंबून असलेल्या ओझरखेडा, पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, सुसरी अशा चार गावांमधील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. ठप्प झालेला पाणीपुरवठा केव्हा सुरळीत होईल याची ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे.

अतिसाराची लागणची शक्यता
ग्रामस्थांना शेत-शिवारातील व अन्य भागातील विहिरीवरून पाणी आणून आपली गरज भागवावी लागत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे तसेच अशा पाण्यामुळे अतिसाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ओडीएचा पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची ग्रामपंंचायतीकडे थकबाकी
ओडीए योजनेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे एक कोटी 71 लाख, बोदवड शहर दोन कोटी 20 लाख तर भुसावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे दोन कोटी 21 लाख अशी एकूण सहा कोटी 14 लाख 60 हजार रुपये जुलै 2018 अखेर पाणीपट्टी थकीत झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपट्टीची रक्कम वसुल करून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेकडे त्वरीत भरणा केल्यास गावातील ठप्प झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.