पाणीटंचाई निवारणार्थ 15 लाखांचा निधी मंजूर
भुसावळ- तालुक्यातील दहा गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेवून आमदार संजय सावकारे यांनी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तांवाना तक्ताळ मंजुरी मिळवली आहे. यामुळे दहा गावांमधील पाण्याची समस्या मार्गी लागण्यास मदत झाली आहे.
या गावांमध्ये विंधन विहिरींना मंजुरी
भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रुक, कंडारी, फुलगाव, कठोरा बुद्रुक, कठोरा खूर्द, साकेगाव, अंजनसोंडे, पिंपळगाव खुर्द, तळवेल आणि वझरखेडे अशा दहा गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत होते. पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परीषदेकडे पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्ताव सादर करण्यात आला होता मात्र सादर करण्यात आलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. याची आमदार संजय सावकारे यांनी दखल घेतल्याने त्यांच्या प्रयत्नांनी 15 लाख रुपयांच्या विंधन विहिरींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये कन्हाळे बुद्रुक दोन, कंडारी पाच, फुलगाव चार, कठोरा बुद्रुक एक, कठोरा खूर्द एक, साकेगाव चार, अंजनसोंडे एक, पिंपळगाव खुर्द दोन, तळवेल चार आणि वझरखेडे तीन अशा 27 विंधन विहीरींचा समावेश आहे. मंजूरी मिळालेल्या कामांना लवकरच सुरूवात होणार असल्याने या गावांमधील पाणी टंचाईची समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
महादेव माळला टँकरने पाणीपुरवठा
तालुक्यातील महादेव माळ येथेही पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी या गावांमध्ये दिवसातून 12 हजार लीटर पाण्याची क्षमता टँकरच्या दोन फेर्या करून पाणीपुरवठा केला जात आहे तर खंडाळे येथे विहिर खोलीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे या गावातील नागरीकांना दिलासा मिळत आहे.
टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न
तालुक्यातील दहा गावांमध्ये निर्माण झालेल्या पाण्याच्या समस्येवर प्रशासनाच्या माध्यमातून मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंजुरी मिळालेली कामे प्रगतीपथावर असून लवकरच पाण्याच्या समस्येचे निवारण केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा अभियंता एस.पी.लोखंडे यांनी दिली.