भुसावळ- तालुक्यातील शिंदी येथे ईश्वरसिंग कैलास सिंग पाटील या शेतकऱ्याच्या 40 पैकी तब्बल १३ शेळ्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना रविवार, ४ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे शेळी पालकांमध्येमध्ये खळबळ उडाली आहे .ऐन दिवाळी व भीषण दुष्काळात हा प्रकार घडल्यामुळे शेतकºयाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत किन्ही येथील पशुवैद्यकीय अधिकारी सातपुते यांनी उर्वरित शेळ्यावर उपचार केले असून, मयत शेळ्यांचा पंचनामा तलाठी मिलिंद देवरे यांनी केला. शेळ्यांचे शवविच्छेदन करून अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती शेळीपालन मालक पाटील यांनी दिली. शेळ्या नेमक्या कशामुळे दगावल्या याबाबत मात्र अद्यापही निश्चित कारण समजू शकले नाही.