भुसावळ तालुक्यातील 21 ट्रान्सफॉर्मर्ससाठी 90 लाखांचा निधी मंजूर !
आमदार संजय सावकारे यांचा यशस्वी पाठपुरावा : नियोजन मंडळातून मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे सहकार्य !
भुसावळ : तालुक्यातील गावांमध्ये 21 नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या (डीपीडीसी) अंतर्गत 90 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या परीसरातील ग्रामस्थांना याचा लाभ होणार आहे.
90 लाखांचा निधी मंजूर
भुसावळ तालुक्यातील काही गावांमध्ये विजेच्या दाबाची समस्या भेडसावत आहे. शेती पंप, त्या-त्या गावांतील पाणीपुरवठ्याचे पंप व घरगुती विजेची समस्या दूर करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी तालुक्यात वीज ओव्हर लोडिंग होत असलेल्या लहान-मोठ्या गावांसाठी 21 नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या (डी. पी. डी. सी.) अंतर्गत 90 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे नवीन मंजूर ट्रान्सफार्मरमुळे शेती, पाणीपुरवठा व घरगुती वीज ओव्हरलोडिंग ची समस्या कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
या गावांना मिळणार नवीन ट्रान्सफॉर्मर्स
कुर्हेपानाचे येथे तीन नवीन ट्रान्सफॉर्मर (18 लक्ष 07 हजार 216) वराडसीम एक (चार लाख), साकरी चार ट्रान्सफॉर्मर (17 लक्ष), मांडवेदिगर दोन ट्रान्सफॉर्मर (9 लक्ष), चोरवड दोन ट्रान्सफॉर्मर (नऊ लक्ष), सुनसगाव दोन (6.40 लक्ष), गोंभी (3.76 लक्ष), साकेगाव (4 लक्ष), वांजोळा (4.11लक्ष), तळवेल 1 ट्रान्सफॉर्मर (3.60 लक्ष), खिर्डी व भुसावळ शिवार दोन ट्रान्सफॉर्मर (7.08 लक्ष) असे एकूण 21 नवीन ट्रान्सफॉर्मर साठी सुमारे 90 लक्ष निधी मंजुर झाला आहे. तसेच एक वा दोन महिन्यात गरज असलेल्या गावांकरीता एक कोटीपर्यंत निधी मंजूर करणार असल्याचेही आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.