भुसावळ- रविवारपाठोपाठ शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे शहर व तालुक्यात पेरण्यांना वेग आला असून बियाणे खरेदीसाठी बी-बियाण्यांच्या दुकानांवर गर्दी झाल्याचे चित्र आहे. जिरायती क्षेत्रावर सोयाबीन, ज्वारी, उडीद, मुग पेरणी जोमात सुरू असून संकरीत कपाशीची लागवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पेरणीयोग्य 28 हजार 559 हेक्टरपैकी या आठवड्यात किमान 18 ते 20 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे. भुसावळ तालुक्यात यंदा 28 हजार 559 हेक्टरवर खरीपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. कृषी विभागाने 60 हजार बिटी कापूस बियाणे पाकिटे तर पाच हजार नॉन बिटी कापूस बियाणे विक्रीसाठी मागविली आहेत.
अंतर्गत रस्त्यांची चाळण
सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे भुसावळ शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. आधीच अमृत योजनेमुळे रस्ते खोदण्यात आल्यानंतर कामानंतर जेसीबीने दबाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंतर्गत कॉलनी भागात रस्ता खराब असल्याने वाहनधारक घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सिंधी कॉलनी, नवजीवन सोसायटी, आदर्श नगर भागात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.