भुसावळ- निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून नवीन मतदारांची नाव नोदणी करण्याचा विशेष कार्यक्रम 1 सप्टेबर ते 31 ऑक्टोबर असे दोन महिन्याच्या काळात घेण्यात आला होता. यात भुसावळ मतदार संघातून 12 हजार 74 नवीन मतदारांनी अर्ज भरून नाव नोंदणी केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून नवमतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम महसूल विभागाने एक सप्टेबर ते 31 ऑक्टोबर या काळात हाती घेतला होता. यासाठी बीएलओसह तहसील कार्यालात मतदारांनी नवीन मतदार नोंदणीचे अर्ज जमा केले. या विशेष मोहिमेत 12 हजार 74 नव मतदारांचे अर्ज जमा झाले असून त्यापैकी आतापर्यत 9 हजार 74 अर्जांची डाटा एन्ट्री झाली आहे. उर्वरित तीन हजार अर्जांची नोद करण्याचे काम निवडणूक विभागातर्फे सुरू आहे. नवीन मतदार नोदणीला या दोन महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार विजय भालेराव, योगेश मुस्कावाड व त्यांच्या सहकार्यांकडून आलेल्या अर्जांची डाटा नोद केली जात आहे. बुधवारपर्यत 9 हजार 74 अर्जांची नोंद झाली असून अद्यापही तीन हजार अर्जांची नोंद करण्याचे काम सुरू आहे. तर नावातील दुरूस्तीसाठी चार हजार 300 अर्ज आले होते. रहिवास बदल करण्यासाठी 416 तर मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी 650 जणांचे अर्ज दाखल झाले आहे. या सर्वांवर प्रक्रीया सुरू आहे, असे निवडणूक शाखेच्या सूत्रांनी सांगितले.