भुसावळ तालुक्यात 27 गावांना विंधन विहिरींना मंजुरी

0

आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्याला यश ; महादेव माळला टँकर सुरू

भुसावळ:- तालुक्यातील गावांना जाणवणार्‍या संभाव्य टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात विंधन विहिरींसह विहिर खोलीकरण व टँकर सुरू करण्यासंदर्भात आमदार संजय सावकारे यांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा अभियंत्यांना प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले होते तसेच त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तालुक्यातील दहा गावांमध्ये 27 विंधन विहिरींना मंजुरी मिळाली असून खंडाळे येथे विहिर खोलीकरण तसेच महादेव माळसाठी प्रति दिवस दोन टँकर सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महादेव माळमध्ये टँकर सुरू
महादेव माळ येथे पाणीप्रश्‍न गंभीर बनल्याने या गावासाठी सोमवार, 16 पासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. एका दिवसात दोन टँकरद्वारे 12 हजार लीटर पाणीपुरवठा केला जाणार आहे तर खंडाळे येथे विहिर खोलीकरणासाठी 24 हजार 846 रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.

या गावांसाठी विंधन विहिरी मंजूर
तालुक्यातील कन्हाळे बु.॥ येथे दोन, कंडारीत पाच, फुलगावला चार, कठोरा बु.॥ एक, कठोरा खुर्दला एक, साकेगावला चार, अंजनसोंडे एक, पिंपळगाव खुर्द दोन, तळवेल चार, वझरखेडा येथे तीन अशा एकूण 27 विंधन विहिरी (हातपंप) मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच येथे कामांना सुरुवात होणार असल्याचे पंचायत समितीचे पाणीपुरवठा अभियंता एस.पी.लोखंडे म्हणाले.

पाणीप्रश्‍न सोडवण्यावर भर -आमदार सावकारे
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीप्रश्‍न गंभीर बनल्याने त्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे संबधित विभागाला सूचित केले होते. जिल्हा दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनी लागलीच दखल घेऊन संबंधित विभागाला आदेश दिल्याने विंधन विहिरींना मंजुरी मिळाल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.