भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील ब्रिटीश काळातील दोन पुल होणार नामशेष

0

महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामास सुरूवात,मात्र पावसाने निर्माण होत अडचणी

भुसावळ- शासनाच्या माध्यमातून धुळे ते नागपुर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे.त्यानुसार चौपदरीकरणाच्या कामास सुरूवात झाली असून भुसावळ ते वरणगाव या मार्गावर असलेले दोन ब्रिट्रीश कालीन पुल या कामामूळे नामशेष होणार आहेत.तर चौपदरीकरणाच्या कामासाठी पाच वर्षापुर्वी महामार्गालगतच्या डेरेदार व हिरव्यागार वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे.

चौपदरीकरणाचे काम संथगतीने
राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून वाढत्या वाहनांची वर्दळ पाहून महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे.यासाठी महामार्गालगतच्या शेती शिवार जागेचे भुसंपादन करण्यात आले असून चौपदरीकरणाच्या कामास एप्रील पासून सुरूवात झाली आहे.मात्र या चौपदरीकरणाच्या कामात भुसावळ ते वरणगाव महामार्गावर असलेल्या हिरा मारोती मंदीराजवळील व फुलगाव आणि जाडगाव या दोन गावांच्या अंतरामध्ये असलेले ब्रिट्रीशकालीन दोन दगडी पुल नामशेष होणार आहेत.यामध्ये हिरा मारोती मंदीराजवळील पुल मोठा आहे.चौपदरीकरणाच्या कामात हिरामारोती मंदीराजवळील नामशेष होणार्‍या या पुलाजवळ अत्याधुनिक पद्धतीने नविन पुलाची निर्मीती केली जाणार आहे.मात्र चौपदरीकरणाचे काम संथगतीने होत असल्याने वाहनधारक व नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

हिरव्यागार झाडांचीही झाली आहे कत्तल
चौपदरीकरणाच्या कामासाठी महामार्गालगतच्या शेतकर्‍यांच्या जमिनीचे भुसंपादन करण्यात आले आहे.मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवात न करता पाच वर्षापुर्वी ठेकेदारामार्फत घाईगर्दीने महामार्गालगतच्या दोन्ही बाजूकडील हिरव्यागार वृक्षांची कत्तल करण्यात आली.यामूळे महामार्गालगतच्या दोन्ही कडील भाग ओसाड दिसून येत आहे.यामूळे महामार्ग प्रशासनाने पुन्हा वृक्षारोपण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

काम होत आहे विलंबाने
तरसोद जि.जळगाव ते चिखली जि.बुलढाणा या भागापर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे कामास सुरूवात झाली आहे.मात्र चौपदरीकरणाचे काम विलंबाने होत असल्याने नागरीक व वाहनधारकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.तर संबधीत कंपनीने या कामासाठी साकेगाव व वरणगाव महामार्गावरील कपीलवास्तू नगर जवळ यंत्र सामुग्री ठेवण्यासाठी शेड तयार केले आहे.