भुसावळ-देवळाली पॅसेंजर 16 सप्टेंबरपासून धावणार

पॅसेंजरला मात्र एक्स्प्रेसचा दर्जा : तिकीट दरात होणार मोठी वाढ

भुसावळ : सुमारे दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे बंद असलेली भुसावळ-देवळाली पॅसेंजर 16 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने प्रवाशांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे मात्र शटलला आता एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आल्याने तिकीट दरात वाढ होणार असल्याचे प्रवाशांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मंगळवार, 16 सप्टेंबरपासून 11113/11114 देवळाली-भुसावळ व भुसावळ-देवळाली पॅसेंजर सुरू होत असून यापूर्वी पॅसेंजरऐवजी मेमू धावणार असल्याची चर्चा होती मात्र एडीआरएम शिवराज मानसपुरे यांनी मात्र आयसीएफ डब्यांमुळे शटलच धावणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पॅसेंजर सुरू करण्याची दोन वर्षांपासून मागणी
कोरोना पार्श्वभूमीवर मार्च 2020 मध्ये पॅसेंजरसह सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर कोरोना कमी झाल्याने टप्याटप्याने बहुतांश गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्याऐवजी मेमू गाड्या सुरु केल्या परंतु देवळाली-भुसावळ शटल सुरू करण्यात न आल्याने हजारो चाकरमान्यांची गैरसोय होत होती मात्र आता रेल्वेने अधिकृतरीत्या नोटीफिकेशन काढले असून 16 सप्टेंबरपासून शटल धावणार आहे. गाडीला 10 डबे जनरलचे असतील तर दोन ब्रेक व्हॅन असतील.

वेळेत बदलामुळे चाकरमान्यांचा संताप
11113 देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस देवळाली येथून सकाळी 7.20 ला सुटेल व भुसावळला दुपारी 12.15 वाजता पोहोचेल तर 11114 भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस भुसावळ येथून सायंकाळी 5.20 वाजता सुटेल व देवळाली येथे 22.45 वाजता पोहोचेल. दरम्यान, देवळाली-भुसावळ एक्स्प्रेसच्या आधीच्या वेळेत बदल करण्यात आल्याने चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. मुळात चाकरमान्यांसाठी अधिक दिलासादायक असलेल्या या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची अपेक्षा आहे. नवीन वेळेत भुसावळकउे धावणार्‍या एक्स्प्रेसचा काहीही फायदा होणार नसल्याची प्रवाशांसह चाकरमान्यांची ओरड आहे.

भुसावळ-वर्धा पॅसेंजरही सुरू होणार
भुसावळ-देवळाली सोबत 11121/11122 भुसावळ-वर्धा व वर्धा-भुसावळ पॅसेंजर सोमवार, 15 सप्टेंबरपासून धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.