भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे महिनाभरापासून संचारबंदी व लॉकडाऊन सुरू असल्याने हातावर पोट भरणार्यांसह सर्वसामान्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील दिव्यांग बांधवांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देता यावा या उद्देशाने भुसावळ नगरपरीषद हद्दीतील 378 दिव्यांग बांधवांना नगरपरीषदेतर्फे पाच टक्के दिव्यांग निधीचे वाटप नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. अडचणीच्या काळात दिव्यांग बांधवांना मदत मिळाल्याने त्यांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले. दरम्यान, पालिका प्रशासनाने यापूर्वीच शहरातील दिव्यांग बांधवांचा सर्वे केला होता व त्यानुसार मदतीचा धनादेश बांधवांना देण्यात आला.
तीन गटात विभागणी करून दिला निधी
दिव्यांग बांधवांची तीन गटात विभागणी करण्यात आली होती व त्यात 80 ते 100 टक्के, 60 ते 73 व 40 ते 59 टक्के प्रमाणे दिव्यांग बांधवांना अनुक्रमे प्रत्येकी पाच हजार, चार हजार व तीन हजार रुपयांचा निधी देण्यात आला. हा निधी दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यावेळी लेखापाल संजय बाणाईते, सामाजिक कार्यकर्ते बापु महाजन तसेच पालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.