भुसावळ नगरपालिका आरोग्य केंद्राची समाजकंटकांकडून नासधूस

0

अज्ञात आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा ; पोलिसांकडून संशयीतांचा शोध

भुसावळ- नगरपालिका आरोग्य विभागाच्या खडका रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राची गुरुवारच्या रात्री समाजकंटकांनी नासधूस केल्याची घटना समोर आली. आरोग्य केंद्रातील दोन संगणक, प्रिंटर, टेबल, टेलीफोन फोडले तर संगणकांना जोडणार्‍या केबल नष्ट करुन पालिकेच्या सार्वजनिक संपत्तीची नासधुस करण्यात आली. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिया शेख (जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नगराध्यक्षांसह लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
शहरातील खडकारोडवरील पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री सेफ्टी डोअरचे स्क्रु तोडण्याचा प्रयत्न झाला होता. यानंतर गुरुवारी रात्री समाजकंटकांनी सेफ्टी डोअर व मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनातील तसेच स्टॉप रुमच्या दालनातील डाटा स्टोअर करण्यासाठी असलेल्या दोन्ही संगणकांची नासधुस करुन प्रिंटर फोडण्यात आले. इतकेच नव्हेतर केबल तोडून टेबल व खुर्चांची नासधुस केली. शुक्रवारी सकाळी ही बाब समोर आल्यानंतर नगराध्यक्ष रमण भोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, देवेंद्र वाणी, भाजपचे पदाधिकारी शे. नईम खॉ सिद्दीक खान व शेख शफी शे. अजीज, सचिन पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. आठवड्यापूर्वीही हनुमाननगर बुस्टर पंपाजवळील पाणीपुरवठ्याची आठ इंची पाईपलाइन समाजकंटकांकडून फोडण्यात आली होती. पालिकेच्या संपत्तीची नासधुस करण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलीस प्रशासनाने अशा लोकांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.