भुसावळ नगरपालिकेच्या सभेत 263 विषयांना मंजुरी
विरोधकांच्या रेट्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग रेल्वेकडे हस्तांरणाचा विषय तहकूब
भुसावळ : सत्ताधार्यांच्या काळातील अखेरच्या टर्मममधील सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी पालिका सभागृहात झाली. या सभेत 263 विषयांना आवाजी मंजुरी देण्यात आली तर अवघ्या सात ते आठ विषयांना मंजुरी देण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाचे रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरण करण्याच्या विषयावर विरोधी गटाने तीव्र आक्षेप नोंदवत निवेदन सादर केल्यानंतर हा विषय अजेंड्यावरुन तहकूब करण्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी जाहीर केले.
तर रस्ता होईल बंद
सभेला सुरवात होताच विरोधी गटातील नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाचे रेल्वेेकडे हस्तांतरण करण्याच्या विषयाला विरोध दर्शवला. या पाठोपाठ स्विकृत सदस्य पुष्पा सोनवणे, माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, नगरसेविका अरुणा सुरवाडे यांच्यासह अन्य नगरसेवकांनीही या मुद्यावर निवेदन सादर केले. हा मार्ग रेल्वेकडे हस्तांतरीत झाल्यास कंडारी गावासह नालंदानगर, समतानगर, रुपवतेे हौसिंग सोसायटी, कवाडे नगर आदींसह उत्तर वॉर्ड भागातील वहिवाटीचा रस्ता रेल्वे प्रशासन बंद करु शकते, यासोबतच अतिक्रमित दुकानदारांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका कायम असल्याने हा विषय रद्द करण्याची मागणी उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर व अन्य नगरसेवकांनी केली. यामुळे हा विषय नगराध्यक्ष रमण भोळे यांनी रद्द केला.
शहर विकासाच्या 263 विषयांना मंजुुरी
जामनेररोड पांडूरंग टॉकीज ते नाहाटा चौफुलीपर्यंत रस्ता तयार करणे, शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याची देखभाल व दुरुस्तीसाठी एजन्सी नेमणूक करणे, अमर स्टोअर्स ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यासाठी मध्य रेल्वेकडे निधी वर्ग करणे, बाजारपेठ भागात नागरीकांच्या संरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व देखभाल दुरुस्ती करणे, पालिका रुग्णालयात औषधे व श्वान दंशाची लस खरेदी करण्याबाबत विचार विनीमय करणे यासह शहर विकासाच्या 263 विषयांना मंजुुरी देण्यात आली.
लोणारी म्हणाले तर कोर्टात जाणार
पाालिकेने विविध राज्य व जिल्हास्तर योजनेतून कामांचे प्रस्ताव टाकण्याबाबत विषय घेतले असलेतरी या कामांमध्ये सर्वसमावेशक प्रस्ताव टाकावे. यात मर्जीतील नगरसेवकांच्या भागातीलच प्रस्ताव दिले तर आपण याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा थेट नगरसेवक युवराज लोणारी दिला. नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले की, रेल्वेकडून डंपिंग ग्राऊंडचा वापर होत असून पालिकेने तीन कोटी खर्चून बायोमायनिंग प्रकल्प उभारला आहे, 25 टक्के रक्कम रेल्वेकडून वसुल करावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्यानिमित्त तसेच इतर खर्चांना कार्योत्तर मंजुरी देण्याचे तीन वेगवेगळ्या विषयांवर आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांनी हरकत घेतली. डॉ.आंबेडकर मार्ग यापूर्वीच रेल्वेकडे हस्तांतरीत झाला, याबाबतचा शासन निर्णय 20 जुलै 2020 रोजीच झाल्याचेही त्यांनी सांगितले.