भुसावळ नगरपालिकेच्या हद्दवाढीला विरोध

0

संयुक्त पत्रकार परीषदेत काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व माजी सदस्य संतोष निसाळकर यांची माहिती ; ग्रामपंचायत स्तरावरून चांगल्या सुविधा ; शहरात नाही तर ग्रामीणला सुविधा देणार कशा?

भुसावळ- फेकरीसह कंडारी ग्रामपंचायत आपल्या स्तरावरून ग्रामस्थांना आपल्या परीने चांगल्या पुरवत असून हद्दवाढ झाल्यास ग्रामस्थांवर करवाढीचा बोजा वाढेल व त्यास आमचा तीव्र विरोध असल्याची माहिती माहिती काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे व पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष नाना निसाळकर यांनी शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी आयोजित पत्रकार परीषदेत दिली. भुसावळ पालिका शहरात धड सुविधा पुरवण्यास सक्षम ठरत नसताना ग्रामीण भागात सुविधा पुरवणार तशी कशी? असा सवालही पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

शहरात नाही ग्रामीणमध्ये सुविधा कशा?
भुसावळ पालिका शहरातील नागरीकांनाच रस्ते, पाणी व अन्य मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी सक्षम नाही तर फेकरीसह कंडारी ग्रामस्थांना सुविधा पुरवणार तरी कशी? असा प्रश्‍न पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. प्रभाकर सोनवणे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या स्तरावरुन गावात चांगल्या सुविधा दिल्या जात असून 15 सदस्यांची कार्यकारीणी झटत आहे. पालिकेने हद्दवाढ केल्यास हद्दीत समाविष्ठ झालेल्या गावांना सुविधा तर मिळणार नाही उलट टॅक्सवाढीचा फटका बसेल. ग्रामपंचायत स्तरावर याबाबत ठराव करुन तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

रीक्त जागांवर करावी भरती
दीपनगर औष्णिक केंद्रातील बंद असलेला संच क्रमांक तीन तत्काळ सुरू करावा, 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संच बंद करू नये, प्रगत कुशल प्रशिक्षण घेणार्‍या प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती, महापारेषण व महावितरण यापैकी रिक्त असलेल्या जागांवर थेट भरती करुन कायम नोकरी मिळावी आदी मागण्यांसाठी आगामी काळात लढा देणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. दीपनगरच्या 660 मेगावॅट प्रकल्पात सध्या मे. भेल कंपनीकडून स्थानिकांना डावलून परप्रांतिय ठेकेदार व मजूरांना कामे दिली जात आहेत. स्थानिकांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य नसल्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही प्रभाकर सोनवणे यांनी व्यक्त केली. पत्रकार परीषदेला फेकरी येथील शेतकरी अशोक बर्‍हाटे, सुभाष पाटील, माजी उपसरपंच संतोष मेश्राम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.