भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांची पत्रकार परीषदेत माहिती : नगराध्यक्ष अपात्रतेसाठी याचिका
भुसावळ : तापीच्या बंधार्यावर पाण्याचा स्त्रोत नसतानाही अमृताची पाईप लाईन टाकून चांगला रस्ता खराब करण्यात आला व आता पुन्हा शेळगाव बंधार्यातून पाईप लाईन टाकण्याचा प्रयत्न सुरू असून चांगले रस्ते खराब करणार्या पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध जेलभरो आंदोलन केले जाणार असून भुसावळातील 22 प्रकरणांबाबत आता खंडपीठात याचिका दाखल करू शिवाय भुसावळ नगराध्यक्षांना अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडे कलम 68 अन्वये याचिका दाखल करणार असल्याची माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परीषदेत दिली. सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
संबंधिताकडून खर्च व्हावा वसुल
राष्ट्रवादीच्या काळात अमृत योजना मंजूर झाली होती शिवाय त्यासाठी स्त्रोत हतनूर असताना सत्ताधार्यांनी तापी नदीवर बंधारा बांधण्याचा घाट घालत डांबरी रस्त्याची दुरवस्था करीत पाईप लाईन अंथरली मात्र आता स्त्रोत बदलण्याच्या नावाखाली टाकलेली पाईपलाईन काढली जात असताना पुन्हा रस्त्याची दुरवस्था केली जात असून या सर्व प्रकाराला जवाबदार असणार्या पालिका प्रशासन, सत्ताधारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांविरुद्ध कारवाई होण्यासह बिले काढणार्यांविरुद्ध कारवाईसाठी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना मैदानात उतरल्याचे माजी आमदार चौधरी म्हणाले.
नगराध्यक्ष अपात्रतेसाठी याचिका
भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सत्तेत आल्यानंतर कुठलेही काम केलेले नाही, शहरातील रस्त्यांची दुरवस्था, आरोग्याचा प्रश्न, अस्वच्छता, गटारींची स्वच्छता आदींमुळे जनता हैराण झाली आहे त्यामुळे नगराध्यक्षांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे कलम 68 अन्वये याचिका दाखल करणार असल्याचे चौधरी म्हणाले. भुसावळातील अमृतसह 22 प्रकरणांबाबत खंडपीठात याचिका दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी न्यायालयात करणार असल्याचे ते म्हणाले.
ब्लॅकलिस्टेड कंपनीला ठेका दिलाच कसा
जैन कंपनी हे ब्लॅकलिस्टेड असताना या कंपनीला ठेका दिलाच कसा? असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित करीत जळगावातही या कंपनीने मुदतीत काम केलेले नाही शिवाय भुसावळातील कंत्राट नियमबाह्यपणे पालिकेऐवजी गुप्त बैठक घेवून देण्यात आल्याने मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे चौधरी यांनी सांगत शेळगाव बंधार्यावरून पाण्याची उचल म्हणजे उलटा प्रवाह असणार असल्याने ही बाब खर्चिक ठरेल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणुका
भुसावळसह वरणगावातील निवडणुका आता महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढवल्या जातील शिवाय जनआधारचे राष्ट्रवादीत विलीनीकरण करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे प्रक्रिया सुरू असून जनआधारचे सचिन चौधरी हेच अध्यक्ष असल्याचे पुरावेही असल्याचा चौधरींनी दावा केला. याप्रसंगी काँग्रेसचे रवींद्र निकम, बुटासिंग चितोडीया, निलेश महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, पत्रपरीषदेपूर्वी प्रांताधिकारी प्रशासनास आघाडीच्या पदाधिकार्यांनी महात्मा गांधी पुतळा रस्त्याच्या कारभाराबाबत निवेदन देत चौकशीची मागणी केली.
सत्ताधार्यांनो नरकातही तुम्हाला जागा नाहीच
भुसावळातील रस्त्यांसह आरोग्य, गटारी, पाण्याच्या प्रश्नाने जनता त्रस्त असून जनतेचा संयमांचा आता कडेलोट झाल्याने सत्ताधार्यांना आता नरकातही जागा मिळणार नाही, असा खळबळजनक टोला माजी आमदार संतोष चौधरींनी पत्रकार परीषदेत लगावताच खळबळ उडाली.
यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, रवींद्र निकम, नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठूर, बुटासिंग चितोडीया, आशिक खान शेरखान, प्रकाश निकम, धीरज पाटील यासह राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जशी दृष्टी, तशी सृष्टी -नगराध्यक्ष
माजी आमदार चौधरी हे त्यांच्या संस्कृतीनुसारच आरोप करीत असून जनतादेखील त्यांना चांगल्या प्रकारे ओळखते. अमृताचे टेंडर ऑनलाईन संबंधित कंपनीला मिळाला असून त्याबाबत त्यांनी आधी माहिती घ्यावी व नंतरच आरोप करावेत, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. चौधरींच्या काळात अंधार दूर झाला नव्हता, रस्त्यांवर पथदिवे नव्हते मात्र आता शहराची परीस्थिती बदलल्याचे ते म्हणाले.