भुसावळ नगराध्यक्षांनी लक्ष न दिल्यानेच भुसावळात हॉकर्स झोन रखडला
शहरातील पत्रकार परीषदेत भाजपाचे माजी नगरसेवक युवराज लोणारी यांची कबुली
भुसावळ : भुसावळ शहरातील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर हजारो बेरोजगारांसह दिव्यांग बांधवांवर उपासमारीची कुर्हाड कोसळली आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षातील पदाधिकार्यांच्या आरोपानंतर बुधवारी भाजपा पदाधिकार्यांनी आरोपांचे खंडण केले. माध्यम प्रतिनिधीने शहरातील ज्वलंत प्रश्नांबाबत भाजपाच्या माजी नगरसेवकांना प्रश्न विचारले. त्यात भुसावळातील हॉकर्स झोनचा प्रश्न पाच वर्ष भाजपाला सत्ता दिल्यानंतरही काही सुटला नाही, यावर माजी नगरसेवक युवराज लोणारी यांनी आम्ही नगराध्यक्षांकडे वारंवार त्याबाबत पाठपुरावा केला मात्र त्यांनी लक्ष न दिल्याने हा प्रश्न रेंगाळला, अशी कबुली त्यांनी दिली.
प्रश्न- भुसावळकरांनी पाच वर्ष भाजपाला सत्ता दिली मात्र साधा हॉकर्स झोनचाही प्रश्न का नाही सुटला ?
लोणारी- आम्ही सभागृहात सत्ताधारी असताना नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे या संदर्भात मागणी लावून धरली होती मात्र नगराध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केले.
प्रश्न- पालिका संकुलांचा प्रश्न पाच वर्ष सत्तेत असूनही सुटलेला नाही, हा प्रश्न सुटला असतातरी बेरोजगारांना दिलासा मिळाला असता ?
लोणारी- ही बाब निश्चित खरी आहे, आमची सत्ता असताना पालिका संकुलाचा प्रश्न सुटणे अपेक्षित होते मात्र तसे घडलेले नाही. मात्र आता प्रशासकीय राजवटीतही हा प्रश्न सुटू शकतो.
प्रश्न- पालिकेच्या सभा केवळ दोन मिनिटात आटोपत्या घेण्यात येवून विषय पत्रिकेचे वाचन न होताच विषय मंजूर करण्यात आले ?
लोणारी- आम्ही प्रत्येक सभा चालू देण्याची नेहमीच भूमिका मांडली शिवाय आम्ही सत्ताधारी असतानाही भुसावळ शहर विकासाच्या मुद्यावर भांडलो शिवाय तुम्हीदेखील सत्ताधार्यांना ‘घरचा आहेर’ म्हणून बातम्या लावल्याचे त्यांनी सांगितले.