भुसावळात बंदला गालबोट : बाजारपेठ पोलिस निरीक्षकासह पाच जखमी

0

हिंसक जमावाची पोलिसांवर दगडफेक : भुसावळातील मॉडर्न रोडवरील आर्य निवास हॉटेलच्या काचाही फोडल्या : शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

भुसावळ : बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरीकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती मात्र व्यापार्‍यांनी बंद झुकारून प्रतिष्ठाने सुरू ठेवल्याने काही कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील आर्य निवास रेस्टारंटवर दगडफेक केल्याने दुकानाच्या काचा फुटल्या तर काझी प्लॉट भागातही दगडफेक झाल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह अन्य तीन कर्मचारी व एक छायाचित्रकार जखमी झाला. बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहराला भेट देत माहिती जाणून घेतली तसेच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा वाढीव बंदोबस्त लावण्यात आला असून जिल्ह्यावरून वाढीव पोलिस कुमक तसेच स्ट्रायकींग फोर्सचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

पोलिसांचा दबाव झुगारून जमावाची दगडफेक
शहरातील व्यापार्‍यांनी मंगळवारीच बंद पाळणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी सकाळी सुरवातीस बाजारपेठ खुली असल्याने शनिमंदीर वार्डाकडून दुकाने बंद करण्यासाठी जमाव येत असतानाच काझी प्लॉटजवळ पोलिसांनी जमाव अडवून तो पांगवला. यावेळी पोलिस व जमावात वाद झाले. याच वेळी जमावातून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे एकच धावपळ झाली. पोलिस आणि जमावात धुश्मचक्री झाल्याने आणि दगडफेक करण्यात आल्याची शहरात माहिती मिळताच अनेक दुकानदारांनी उघडलेली दुकाने पटपट बंद केली. जमावाने बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गाडीवर ही दगड फेकले. दरम्यान, रजा टॉवरमार्गे काही जमाव पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील हॉटेल आर्य निवाससमोर जमल्यानंतर काहींनी दुचाकी फेकल्या तर काहींनी हॉटेलवर दगड भिरकावल्याने दुकानाची तावदाने फुटली. यानंतर डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला पांगविले.

पोलिस निरीक्षकांसह पाच जण जखमी
हिंसक जमावाने काझी प्लॉट परीसरात केलेल्या दगडफेकीत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह डीबीतील कर्मचारी कृष्णा देशमुख, नंदकिशोर सोनवणे, संजय भदाणे हे चौघे जखमी झाले तसेच दैनिक दिव्यमराठीचे छायाचित्रकार कमलेश चौधरी यांच्या डोक्याला दगड लागल्याने तेदेखील जखमी झाले. कृष्णा देशमुख यांना अधिक मार लागल्याने त्यांना शहरातील डॉ.निलेश महाजन यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी काढला रूटमार्च
काझी प्लॉटमधील पुलावर झालेल्या दगडफेकीमुळे डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह पोलिसांनी पूलावरूनच काझी प्लॉट, रजा टॉवर, अमरदिप टॉकीज, पोस्ट कार्यालय, सराफ बाजारातून भजे गल्लीतून अप्सरा चौकात रूटमार्च काढला.

दोषींवर कठोर कारवाई -पोलिस अधीक्षक
भुसावळ घडलेली घटना निश्‍चित अप्रिय असून पोलिसांकडून आता दोषींवर निश्‍चितच कठोर कारवाई केली जाईल, आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या असल्याचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले म्हणाले. याप्रसंगी त्यांनी आर्य निवासचे मालक खुशाल जोशी यांच्याशी चर्चा केली.

खडका चौफुलीवर बॅरीगेटस लावून रस्ता रोकोचा प्रयत्न
शहरातील खडका चौफुलीवर सकाळी 10.30 वाजता जमावाने महामार्गासाठी असलेले बॅरीगेटस लावून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला मात्र बाजारपेठचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहायक फौजदार तस्लीम पठाण आणि शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांनी तत्काळ रस्त्यावरील बॅरेकेट काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान, खडका चौफुलीवर दुपारी एका वाजेच्या सुमारास जमाव पुुन्हा जमा झाला. यावेळी बामसेफ संघटनेचे कार्यकर्ते प्रतिभा उबाळे, एम.एम.मन्सुरी, हमीद शेख आदींनी जमावाला मार्गदर्शन केले. जोपर्यंत कायदा रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल तसेच मैदानावरची लढाई लढतच रहा, असे आवाहन करण्यात आले.

सीसीटीव्हीवरून संशयीतांचा शोध
पोलिसांवर दगडफेक करणार्‍यांसह आर्य निवास हॉटेलवर दगड भिरकावणार्‍यांचा रात्री बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात सहा ते सात संशयीत असल्याची माहिती आहे मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल नसल्याने अधिकृत माहिती कळू शकली नाही.