भुसावळ निकृष्ट कामांमुळे ढापे तुटले : अपघाताची वाढली भीती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांची तक्रार

भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौकाकडून पाटील मळा व रामदेव बाबानगरकडे जाणार्‍या रस्ताचे नूतनीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांनी केली. त्यानुसार एक-दोन महिन्यांपूर्वीच सर्वेश्वर नगर व सिद्धेश्वर मंदिराजवळील ढापे बनवण्यात आले मात्र काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्व ढापे हे आता नादुरुस्त झाले आहेत. या ढाप्यांवरून गटारीचे पाणी वाहत असल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत शिवाय तुटलेल्या या ढाप्यात वाहने अडकून पडल्याच्या दररोज घटना घडत असून वर्दळीच्या या भागात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी या भागास भेट द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे निलेश कोलते यांनी केली आहे.

दुर्घटनेची जबाबदारी पालिकेची
दुचाकीचालक, रीक्षा चालक, वयोवृद्ध महिला व विद्यार्थ्यांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. वाहने ढाप्यात आदळतात त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळते तर पाठदुखीचा त्रास वाहन चालकांना होत आहे. खड्डे टाळण्याचा प्रयत्नात या भागात किरकोळ अपघातही घडले आहेत. रात्रीच्या वेळेला ढाप्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहन चालकांचे अपघात होत आहेत त्यामुळे वाट काढणे जिकिरीचे होते. भुसावळ नगरपालिका प्रशासनाने त्वरीत सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौक, रामदेव बाबा मंदिराजवळील तसेच राजगौड सोसायटी जवळील तसेच सिद्धेश्वर मंदिर, मणियार हॉल जवळील या सर्व चारही ढाप्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा या ठिकाणी घडणार्‍या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी भुसावळ नगरपालिकेची असेल, असे नागरीकांचे म्हणणे आहे.