भुसावळ परीससरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोटरीचे प्राधान्य

पत्रकार परीषदेत माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे प्रतिपादन

भुसावळ : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक युवकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. त्यांना रोजगार मिळवून देण्यास रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स प्राधान्य देणार आहे आणि त्याचसाठी रोजगार मेळावा आयोजित केला असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा रोटेरीयन उमेश नेमाडे यांनी शनिवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परीषदेत सांगितले. यावेळी रॉयल्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव अ‍ॅड.विनोद तायडे, प्रकल्प प्रमुख महेश फालक आदी उपस्थित होते.

5 रोजी रोजगार मेळावा
भुसावळ येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्स व सिद्धवेद इन्फोटेक, भुसावळतर्फे मंगळवार, 5 ऑक्टोबर रोजी संतोषी माता हॉल येथे सकाळी 8 वाजता बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे 30 ते 35 कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, डिग्री इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीतून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे उमेश नेमाडे यांनी सांगितले. सदर मेळाव्यासाठी नीरज त्यागी (संचालक- भारतेंद्र प्रा लि. दिल्ली), ए.आर.यादव (मॅनेजर-सेंच्युरीयन युनिव्हर्सिटी, ओरीसा), योगेश जाधव, (संचालक- कौशल्य विकास बोर्ड, पुणे), विकास कुंजीर (संचालक कौशल्य विकास बोर्ड, पुणे), रामचंद्र येवले (संचालक कौशल्य विकास बोर्ड, पुणे) आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनी सांगितले. काही कंपन्या कॅम्पमधून ऑनलाईन मुलाखती घेऊन लगेचच नियुक्ती पत्र देणार असल्याचे प्रकल्प प्रमुख महेश फालक यांनी सांगितले. भुसावळ व परीसरातील बेरोजगार युवकांसाठी नोकरीची संधी रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्सने उपलब्ध करून दिलेली असल्याने युवकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी रॉयल्स क्लब भुसावळ, सिद्धवेद इन्फोटेक व प्रायोजक साईजीवन सुपर शॉपीतर्फे करण्यात आलेले आहे.