भुसावळ पालिका निवडणुकीत पुष्पा सोनवणे नगराध्यक्षा होणार : पीआरपी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे

भुसावळ : शहरातील रेल्वे हद्दीत राहणार्‍या गोरगरीबांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला मात्र गेल्या अनेक वर्षानंतरही गोरगरीबांना हक्काचे घरकुल मिळालेले नाही. अतिक्रमण हटवताना केंद्राने हक्काचे घरकूल नागरीकांना द्यावयाचे होते व राज्य सरकारने तातडीने रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना व विविध योजनांच्या माध्यमातून जागा द्यायला हवी होती मात्र तसे घडले नाही मात्र यापुढे पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या आंदोलनातून त्यांना हक्काचे घरकुल मिळाल्याशिवाय (सातबारा उतारा दिल्याशिवाय) पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे जनआंदोलन थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी शहरात आयोजित निर्धार मेळाव्यात दिला. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात रविवारी दुपारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, भुसावळसह जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढू व आघाडीला युती करावयाची झाल्यास त्यांनी हात मिळवणी करावी, भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे याच नगराध्यक्षा असतील, अशी घोषणाही त्यांनी येथे करीत हे ज्यांना मान्य असेल, त्यांनीच सोबत यावे, असे विधानही केले.

आगामी निवडणुका स्वबळावर !
भुसावळ नगरपालिकेसह जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणुका पीआरपी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पीआरपी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली. आघाडीला युती करायची असल्यास त्यांनी आमच्याशी हात मिळवणी करून चर्चा करावी, असेही त्यांनी सांगत भुसावळ पालिकेच्या आगामी निवडणुकीत पीआरपीच्या पुष्पा जगन सोनवणे याच नगराध्यक्षा असतील, ज्यांना हे मान्य असतील त्यांनी सोबत यावे, असेही प्रा.कवाडे यांनी सांगितले.

तर आम्हाला नवीन मित्र शोधावा लागेल
राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे म्हणाले की, आघाडी सरकारने सत्तेत सन्मानपूर्वक आम्हाला वाटा दिला नाही तर येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र शोधावा लागेल. आम्ही घटक पक्षात असतानाही आम्हाला सत्तेत सहभाग मिळालेला नाही, असे जयदीप कवाडे म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर पीआरपी राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे, माजी नगरसेविका पुष्पा सोनवणे, पीआरपी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, पीआरपी प्रदेशाध्यक्ष गणेश सोनवणे, पीआरपी अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष आरीफ शेख (फैजपूर), ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गोपी साळी, चर्मकार समाजाचे नेते जयराज पुरभी, पीआरपी रावेर तालुका उपाध्यक्ष चंदू पहेलवाल, सचिन बार्‍हे, चरणदास इंगोले, अनिल तुरूकमारे, संतोष मोकळ, विलास निकाळे (मुंबई), नगरसेवक सुरेशभाई सोनवणे (सुरत), मुकूंद सपकाळे, नारायण सपकाळे (जळगाव) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.