आरोपींना शहर पोलिस आज न्यायालयात करणार हजर ; पोलिस कोठडीची करणार मागणी
भुसावळ- वाढदिवसाची पार्टी आटोपून आलेल्या तरुणांच्या टोळक्याने गोपाळ नगरातील पालिकेच्या कार्यालय आवारातील पालिकेचा अग्नीशमन बंब पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना तसेच वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याची घटना बुधवारी, 24 एप्रिल रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणातील नऊ पैकी सात संशयितांना अटक करण्यात आली होती. या आरोपींची शुक्रवारी सकाळी भुसावळ दुय्यम कारागृहात नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यासमक्ष ओळख परेड घेण्यात आली. यावेळी गुन्ह्यातील तक्रारदार तसेच साक्षीदारांनी सातही आरोपींना ओळखले. दरम्यान, शनिवारी सातही आरोपींना शहर पोलिस भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर करणार असून त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करणार आहेत. या गुन्ह्यात अद्याप दोन संशयीत पसार असून चोरीला गेलेले पितळी नोझेल देखील जप्त करावयाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नायब तहसीलदारांसमक्ष ओळख परेड
शुक्रवारी सकाळी भुसावळातील दुय्यम कारागृहात असलेल्या संशयीत आरोपी गौरव बढे, विशाल दिलीप सूर्यवंशी (रा. कोळीवाडा, भुसावळ) व चेतन उर्फ गोलू दिलीप रडे (रा.जुना सातारा, भुसावळ), सचिन अरविंद भालेराव (18, श्रीनगर, भुसावळ), भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (23, शिव कॉलनी, भुसावळ) व सचिन मनोहर कोळी (24, सूर्यवंशी, श्रीनगर, भुसावळ), जितू शरद भालेराव (24, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) यांची नायब तहसीलदारांसमक्ष ओळख परेड घेण्यात आली. याप्रसंगी तक्रारदार तसेच साक्षीदार यांनी सातही आरोपींना ओळखले तसेच त्यांनीच गुन्हा केल्याचे सपकाळे यांना सांगितले. दरम्यान, शहर पोलिसांनी यापूर्वीच पोलिस कोठडीचा हक्क राखून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती तर या आरोपींना पुन्हा शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात अद्याप दोन संशयीत पसार असून पालिकेचा पितळी डिझेल नोझेलदेखील चोरीला गेल्याने तो जप्त करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत.