भुसावळ पालिकेकडून विकासकामे करताना नियमांना बंगल

नियमानुसार कामे न झाल्यास न्यायालयात जाण्याचा परीवर्तन मंचचा इशारा

भुसावळ : भुसावळ पालिकेकडून विकासकामे करताना निधीची उधळपट्टी करण्यात येत असून अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची आशंका परीवर्तन मंचच्या सदस्यांनी शनिवारी पत्रकार परीषदेत उपस्थित करीत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

ही तर जनतेच्या निधीची उधळपट्टी
भुसावळ पालिकेने डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात खेळण्यांसाठी 57 लाख 74 हजार रुपयांचा निधी खर्च केला मात्र नामांकित कंपन्यांकडून 27 लाखांमध्ये ही खेळणी बसवता आली असती याबाबत सत्यता बाहेर येण्यासाठी परीवर्तन मंचने देशभरातील कंपन्यांकडून याबाबतचे दरपत्रक मागवले आहे. प्रशासकिय अधिकार्‍यांवर कारवाईसाठी यातून मागणी करणार असल्याची माहिती यावेळी मंचचे अध्यक्ष जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.

खंडपीठात याचिका दाखल करणार
यावेळी बोलताना प्रा.लेकुरवाळे म्हणाले की, 15 जानेवारी 2019 रोजी ई-निविदा सूचना क्र. 29 प्रमाणे शहरातील रस्ते कामांची निविदा काढली असतांना त्यात केवळ कुठून कुठपर्यंत रस्ता तयार करावयाचा आहे हे नमूद केले आहे. परंतु त्या रस्त्याची प्रत्यक्ष लांबी, रुंदी व जाडी किंवा खडीचा प्रकार नमूद केलेला नाही. लांबी, रुंदी, जाडी किंवा दर्जाबाबत कोणताही उल्लेख नसलेली निविदा काढल्यास केवळ प्रशासकिय यंत्रणा किंवा त्यावेळच्या राजकीय व्यवस्थेच्या जवळचा व्यक्तीच निविदा भरू शकतो. अशाने उत्तम किंवा दर्जेदार कार्य होईल यावर शंका उपस्थित होते, असेही प्रा.लेकुरवाळे म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी परीवर्तन मंचचे सदस्य डॉ. विरेंद्र झांबरे, अ‍ॅड. जास्वंदी भंडारी, अ‍ॅड. मनिष सेवलानी, अ‍ॅड. दिनेश चव्हाण, प्रवीण वर्मा, मंगेश भावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंग रावळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.