अटकेतील आरोपींची संख्या झाली सात ; लवकरच होणार ओळख परेड
भुसावळ- वाढदिवसाची पार्टी आटोपून आलेल्या तरुणांच्या टोळक्याने गोपाळ नगरातील पालिकेच्या कार्यालय आवारातील पालिकेचा अग्नीशमन बंब पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार, 24 एप्रिल रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणातील नऊपैकी तीन संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते तर या गुन्ह्यातील आणखी तीन संशयीतांना सोमवारी तर एकाला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आल्याने अटकेतील आरोपींची संख्या आता सात झाली आहे.
पालिकेचा बंब पळवण्याचा झाला प्रयत्न
संशयीत आरोपी गौरव बढे याच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून तरुणांचे टोळके पालिका कार्यालयासमोर धडकले. पालिका कार्यालयाजवळ मोबाईलवर गाणे वाजवत संशयीत नाचल्यानंतर त्यांनी पालिका कर्मचार्यांना शिवीगाळ केली. संशयितांपैकी विशाल दिलीप सूर्यवंशी याने पालिकेचा भरलेला अग्निशामक बंब (क्र.एम.एच.19 एम.9168) सुरू करून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता व या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. पालिका कर्मचार्यांनी संशयीतांना विरोध करताच संशयीतांनी पालिका बंबाच्या काचा फोडल्या होत्या तसेच पितळी नोझल घेऊन अंधारात पळ काढला होता मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस सुरुवातीला गौरव बढेपर्यंत व नंतर इतरापर्यंत पोहोचले. घरी पाणी नसल्याने पालिकेचा बंब पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब संशयितांनी शहर पोलिसांना दिला आहे. या प्रकरणी सुरुवातीला गौरव बढे, विशाल दिलीप सूर्यवंशी (रा. कोळीवाडा, भुसावळ) व चेतन उर्फ गोलू दिलीप रडे (रा. जुना सातारा, भुसावळ) यांना अटक करण्यात आली असून पोलिस कोठडीचा हक्क राखून त्यांना 4 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुन्हा चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या
या गुन्ह्याप्रकरणी शहर पोलिसांनी सोमवारी रात्री सचिन अरविंद भालेराव (18, श्रीनगर, भुसावळ), भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (23, शिव कॉलनी, भुसावळ) व सचिन मनोहर कोळी (24, सूर्यवंशी, श्रीनगर, भुसावळ) यांना अटक केली तर मंगळवारी सकाळी जितू शरद भालेराव (24, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद, साहील तडवी, सुनील सैंदाणे यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, संशयीत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी यापूर्वीच शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत.