लोकजनशक्ती पार्टीचा भाविकांसह तीव्र आंदोलनाचा इशारा
भुसावळ- पालिकेच्या माध्यमातून संकलीत केला जाणारा शहरातील केरकचरा महामार्गावरील जळगावरोडवर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका माता मंदिराकडे जाणार्या मार्गावर टाकले जात असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटून भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची पालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली आहे.
मंदिराच्या मार्गावर अनधिकृत डंपिंग ग्राऊंड
महामार्गावरील जळगाव रोडवर शहर व परीसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका माता मंदीरात दर्शनार्थ भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र या मंदीराकडे जाणार्या एकमेव मार्गालगत शहरातील केरकचरा नगरपालिका प्रशासनाकडून आणून टाकला जात आहे. यामुळे या भागात अनधिकृतरीत्या डंपीग ग्राऊंड तयार झाले असून साठलेल्या कचर्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असल्याने मंदीराकडे दर्शनार्थ जाणार्या भाविकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.तसेच याबाबतीत लोकजनशक्ती पार्टीने वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे मात्र पालिका प्रशासनाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असून एकप्रकारे भाविकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न सुरू आहे तर पालिका प्रशासनाकडून शहरात स्वच्छता तर शहरालगत अस्वच्छता निर्माण करण्याचा प्रकार निंदनीय असल्याची भावना त्रस्त नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.
मृत जनावरांमुळे सुटली दुर्गंधी
शहर व परीसरात मृतावस्थेत आढळून आलेली मृत जनावरेही याच परीसरात आणून टाकली जात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. यामुळे मंदीराकडे जाणार्या येणार्या भाविकांना दुर्गंधीचा त्रास सहन करीत दर्शनार्थ मार्गक्रमण करावे लागत असल्याने तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे.मृत जनावरे व केरकचरा मंदीराच्या या मार्गावरच का ? असा संतप्त प्रश्न व्यक्त केला जात आहे.
लोकजनशक्ती पार्टी करणार आंदोलन
मंदिराच्या मार्गावर टाकला जाणारा केरकचरा व मृत जनावरांच्या बाबतीत लोकजनशक्ती पार्टीने पालिका प्रशासनाला ही समस्या मार्गी लावण्याची विनंती केली आहे मात्र पालिका प्रशासनाकडून हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने लोकजनशक्ती पार्टीचे महेंद्र पाटील, हेमंत खरात, मधुकर इंगळे, संजय कदम, अरबाज खान, हितेश टकले, विक्की राजपुत, नसीरखान आदींनी भाविकांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.
परीसरातील रहिवाशांनाही त्रास
नाहाटा चौफुलीवरून जळगाव व वरणगावकडील मार्गावरील रहिवासी भागालगत महामार्गाच्या कडेला शहरातील केरकचरा आणुन टाकला जातो. परीणामी सुटणार्या वार्यामुळे दुर्गंधीचा वास थेट परीसरातील रहिवाशांच्या घरापर्यंत पोहचत असल्याने त्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यामुळे रहिवासी भागातील नागरीकांमध्ये पालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
दुय्यम कारागृहाच्या जागेवरही कचरा
शहरातील संकलित केलेल्या केरकचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने पालिकेचे ठेकेदार शहरालगत जिथे जागा मिळेल तेथे कचरा टाकत आहेत. याच प्रकारे दुर्गंधीची समस्या निर्माण झाल्याने नुकतेच खेडी गावातील नागरीकांनी नुकतेच आंदोलन केले होते तर जामनेर रोडवरील दुय्यम कारागृहाच्या नियोजित जागेवरही कचरा टाकला जात असल्याने हा कचरा त्वरीत उचलण्यात यावा असे पत्र कारागृह अधीक्षकांनी पालिका प्रशासनाला दिले आहे.