भुसावळ पालिकेची उद्या विषय समिती सदस्य निवडीसाठी सभा

0

उपनगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच ; सईदा शफी यांना संधी मिळण्याची शक्यता

भुसावळ- पालिकेतील विषय समितीच्या सदस्यांची नावे नामनिर्देशित करण्यासाठी गुरुवार, 3 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेची विशेष सभा होत आहे. सदस्यांच्या निवडीनंतर विषय समिती सभापतींची निवड केली जाणार असून यंदा कोणत्या नगरसेवकांना कोणत्या समितीवर संधी मिळते याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहेत तर या सोबतच उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांचे वातावरण व सामाजिक समीकरणांचे गणित पाहता शेख सईदा शफी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्या पालिकेची विशेष सभा
महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 63 तसेच महाराष्ट्र नगरपालिका विषय समिती निवडणूक नियम 1966 मधील तरतुदीनुसार स्थायी समिती व विषय समिती सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी विशेष सभा घ्यावी लागते. ही सभा 3 रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात होणार आहे. या सभेची सूचना जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी नगरसेवकांना दिली आहे. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित राहतील.

उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
भाजपने युवराज लोणारी, लक्ष्मी मकासरे यांना संधी दिली आहे तर सामाजिक समीकरणांचे गणित पाहता यंदा शेख सईदा शफी यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे तर अभ्यासू असलेल्या प्रा.दिनेश राठींसह अ‍ॅड.बोधराज चौधरी, रमेश नागराणी, पिंटू कोठारी यांची नावेदेखील चर्चेत असून अंतिम निर्णय माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे आदी घेणार असल्याने या पदावर कुणाची वर्णी लागते ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.