भुसावळ पालिकेची गोंधळाविना पार पडली सभा

0

विरोधी नगरसेवकांनी कारवाईविरोधात टाकला सभेवर बहिष्कार

भुसावळ- पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार, 30 रोजी सकाळी 11 वाजता गोंधळाविना पार पडली. सभेत 34 विषयांना सत्ताधार्‍यांनी एकमताने मंजुरी दिली तर जनआधार विकास पार्टीच्या गटनेत्यांसह चौघा नगरसेवकांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ जनआधारच्या नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला व त्याबाबत मुख्याधिकार्‍यांना तसे पत्रही दिले. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे व मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते.

34 विषयांना सभागृहात मंजुरी
पालिकेच्या सभेत शहर विकासाच्या 34 विषयांना मंजुरी देण्यात आली. नगरसेवक पिंटू कोठारी यांनी शहरातील पालिकेच्या मालकिचा विहिरींचा उपसा करून त्या वापरात आणण्याची सूचना केली तसेच पालिकेच्या तापीतील बंधार्‍याच्या उंचीचे काम उन्हाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच करण्याबाबत विषय मांडला तसेच शहरातील स्मशानभूमी व कब्रस्थानमध्ये खाजगी इसमाची स्वच्छतेसाठी नियुक्ती करण्याची सूचना मांडली. त्यास स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी अनुमोदन दिले. नगराध्यक्षांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही देत आगामी बैठकीत स्मशानभूमीसाठी खाजगी व्यक्तीची नेमणूक करण्यासंदर्भात विषय घेतला जाईल, अशी हमी दिली.

बैठकीपूर्वी आजी-माजी नगरसेवकांची शाब्दीक चकमक

पालिकेच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणाी व अ‍ॅड.बोधराज चौधरी, माजी नगरसेवक वसंत पाटील यांच्यात प्रभागातील विकासकामांवरून चांगलीच शाब्दीक चकमक रंगली. प्रभाग क्रमांक आठमधून प्रतिभा वसंत पाटील व युवराज लोणारी हे निवडून आले आहेत. नगरसेविका पती वसंत पाटील यांनी पालिकेच्या आवारात लोणारी यांना विशिष्ट भागात मीच काम करेल, असे सांगितल्यानंतर उभयतांमध्ये चांगलाच वाद झाला. तत्पूर्वी अ‍ॅड.बोधराज चौधरी व लोणारी यांच्यातही या विषयावरून हमरी-तुमरी झाली तर हा वाद मिटल्यानंतर लोणारी व पाटील यांच्यातील वाद रंगला. आपण संपूर्ण प्रभागाचे नगरसेवक असल्याने कुठे विकासकामे करायची हा आपला अधिकार असल्याचे लोणारी यांनी सांगत त्याबाबत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, शिवाय तुम्ही नगरसेवकही नाहीत, असे सुनावल्याने वादात अधिक भर पडली. उपस्थित नगरसेवकांनी उभयतांना बाजूला नेल्याने वाद शमला मात्र पालिकेच्या बैठकीनंतर मुख्याधिकार्‍यांच्या दालनानजीक याच विषयावर पुन्हा वाद रंगला तर यावेळी नगराध्यक्षांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला.