भुसावळ पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सोनी बारसे यांची बिनविरोध निवड

भुसावळ पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच मेहतर वाल्मिकी समाजाला मिळाली संधी

भुसावळ : भुसावळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजप नगरसेविका सोनी संतोष बारसे यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. ऑनलाइन विशेष सभेसाठी 28 नगरसेवक सहभागी झाले. सत्ताधारी गटाचे 26 तर विरोधातील केवळ दोन नगरसेवक ऑनलाइन सभेला उपस्थित होते. पालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच मेहतर वाल्मिकी समाजाला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर निवडीसाठी मंगळवारी दुपारी 12 पीठासीन अधिकारी दीपक धीवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार उपस्थित होते.

आमदारांनी केला सत्कार
नवनियुक्त उपनगराध्यक्षा सोनी बारसे यांच्या निवडीनंतर आमदारांच्या निवासस्थानी रजनी सावकारे यांनी सत्कार केला. पालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर सरळ दोन गट झाले आहेत. मात्र सोनी बारसे यांच्या नावाला दोन्ही गटांची पसंती असल्याचे सत्काराच्या कार्यक्रमात दिसून आले.

काच बंगल्यावरही केला सत्कार
निवडीनंतर काच बंगल्यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी उपनगराध्यक्षा बारसे यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, वसंत पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, किरण कोलते, अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, रमेश मकासरे, देवा वाणी, माजी नगरसेवक संतोष बारसे आदींची उपस्थिती होती.