तक्रारीनंतर शहर पोलिसांनी केली पाहणी : उपद्रवींचा बंदोबस्त करण्याची मागणी
भुसावळ- जळगाव रोडवरील नगरपालिकेच्या शाळा क्रंमाक एक येथे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकार्यांचे कार्यालय असून रविवारी मध्यरात्री अज्ञात टवाळखोरांनी कार्यालयाचे कुलूप तोडून संगणकाची तोडफोड करीत अन्य साहित्याचीही नासधूस केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. विशेष म्हणजे मनोविकृत ईसमांनी कार्यालयातील टेबलांवर शौचही केल्याने शहरवासीयांमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी कार्यालयाचे लिपिक यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
शासकीय मालमत्तांची नासधूस करण्याचे प्रमाण वाढले
नगरपालिकेच्या शाळा क्रंमाक एकमध्ये पालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकार्याचे कार्यालय आहे मात्र जळगाव रोडवर असलेल्या या शाळेच्या आवारात रात्री टवाळखोरांचा उपद्रव असतो.शाळेच्या परीसरात मद्यपान करून रीकाम्या बाटल्या कार्यालयाजवळच टाकल्या जातात यामुळे सकाळी कार्यालयात येणार्या अधिकारी व कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागतो. रविवारी तर अज्ञात टवाळखोरांनी हद्द करीत कार्यालयाचे कुलुप तोडून कार्यालयातील टेबलांवर विष्टा (शौच) करून कपाटातील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकली तसेच कार्यालयातील संगणकाचीही तोडफोड केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी कार्यालयातील लिपिक जगदीश पाटील यांनी सकाळी वरीष्ठांच्या सुचनेनुसार शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार गजानन देशमुख व सहकार्यांनी दुपारी उशिरा घटनास्थळाची पाहणी केली.
टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
शहरात रात्री-अपरात्री टवाळखोर युवक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून उपद्रव करीत असल्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. यामुळे परीसरातील नागरीक त्रस्त झाले असून पोलिसांनी शहरातील व्यापारी, संकुले, उद्याने आदी भागातील गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खडका रोडवरील पालिकेच्या आरोग्य केंद्राची अशाच पद्धत्तीने तोडफोड करण्यात आली होती तर या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.