जनआधारचा आरोप ; सत्ताधार्यांच्या काळातील सर्व सभा रद्दची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भुसावळ- पालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर करून सत्ताधार्यांनी दडपशाही चालवली असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याने दोन वर्षांच्या काळातील सर्व सभा रद्द कराव्यात, अशी मागणी जनआधार विकास पार्टीच्या सर्व नगरसेवकांसह माजी आमदार संतोष चौधरी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे केली. जिल्हाधिकार्यांनी या गंभीर प्रकाराची लागलीच दखल घेत नगरपालिका प्रशासन विभागाचे अधिकारी कानडे यांना सर्व सभांचे छायाचित्रण ताब्यात घेण्याचे आदेश देत आठ दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिल्याचे जनआधारचे गटनेता उल्हास पगारे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
सभांमध्ये पोलीस बळाचा वापर
जनाधारच्या निवेदनानुसार सत्ताधारी बैठकांमध्ये पोलीस बळाचा वापर करतात शिवाय आमचे नगरसेवक उभे राहिल्यानंतर त्यांना हिनवून खाली बसायला भाग पाडले जाते शिवाय महिला नगरसेविकांना पुढे केले जाते. यापूर्वी अशाच पद्धत्तीने आमच्या नगरसेवकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. आम्ही नागरीकांच्या समस्या मांडत असताना सत्ताधारी नगरसेवक गोंधळ घालून स्वतःच सर्व विषयांना मंजुरी असल्याचे सांगून सभा मंजूर करतात व अवघ्या दोन मिनिटात शंभर ते दोनशे विषयांना मंजुरी मिळवली जाते, असेही निवेदनात नमूद आहे. कुठल्याही चर्चेविना सत्ताधारी दडपशाही पद्धत्तीचा अवलंब करून सर्व विषय मंजूर करून घेतात शिवाय यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते, असा आरोपही करण्यात आला आहे.
सभागृहात पोलीस येतात कसे ?
नगरपालिकेच्या सभागृहात पोलिसांकडून होणारी दडपशाही अत्यंत दुर्दैवी बाब आहे शिवाय सभागृहात पोलीस येतात कसे? असा प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली होवून भारतीय राज्य घटनेच्या दृष्टीने ही बाब निंदणीय असल्याने नगरपरीषद अधिनियम कलम 308 नुसार आजपर्यंत झालेल्या सर्व सभा तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तक्रारीबाबत दखल घेतली न गेल्यास 18 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, संतोष चौधरी, राहुल बोरसे, कविता चौधरी, नीलिमा पाटील, दुर्गेश ठाकूर, रवींद्र सपकाळे, संगीता देशमुख, शबानाबी सिकंदर खान, नूरजहाँ आशिक खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत. निवेदन देताना माजी आमदार संतोष चौधरी उपस्थित होते.
शहर बकाल, सत्ताधारी मालामाल -संतोष चौधरी
सत्ताधार्यांनी चालवलेल्या दडपशाही विरोधात जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. पोलीस बळाचा वापर करून घेतल्या जात असलेल्या बैठका निंदणीय बाब आहे. ज्या सभांचे विषय वाचनच झालेले नाही त्यामुळे त्या सभा रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. सत्ताधार्यांच्या गैरव्यवहाराबाबत लवकरच पत्रकार परीषद घेऊन गौप्यस्फोट करू. आमच्या तक्रारीची दखल घेतली न गेल्यास 18 पासून आमचे सर्व नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपल्यासह उपोषणाला बसतील. शहराचा चौफेर विकास होण्याऐवजी शहर बकाल होत असून सत्ताधारीच मात्र मालामाल होत असल्याचे माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले.