भुसावळ : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत रेल्वे उत्तर भागातील झोपडपट्टी धारकांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात विषय का घेण्यात आला नाही? या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधी नगरसेविका भिडून झटापट झाल्याने अवघ्या तीन मिनिटात सभेत सर्व विषयांना मंजुरी देऊन सत्ताधारी बाहेर पडले. विरोधकांनी सत्ताधार्यांचे हे पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मंगळवारी सकाळी 11 वाजून सात मिनिटांनी सुरुवात झाली तर सभेच्या पहिल्याच विषयाचे वाचन सुरू होत नाहीच तोच नगरसेविका सोनवणे यांनी ज्या गोरगरीबांच्या जीवावर तुम्ही निवडून आले त्या गरीबांचा विषय अजेंड्यावर का घेतला नाही? असे म्हणत जाब विचारला. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी या संदर्भात राजू सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी मोर्चे काढल्याचे सांगितल्याने सोनवणे अधिकच संतप्त झाल्या. यावेळी पूजा सूर्यवंशी यांनी त्यांच्या हातातील माईकचा ताबा घेतल्याने उभयंतांमध्ये काहीशी झटापट होवून सभागृहात वातावरण तापले तर पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सर्व विषयांना मंजुरी म्हटल्याने सत्ताधार्यांनी सभागृह सोडले तर विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टिकास्त्र सोडून तीव्र संताप व्यक्त केला.