भुसावळ पालिकेच्या सभेत शहर विकासाच्या 39 विषयांना सर्वानुमते मंजुरी

0

शहरात होणार बंदिस्त नाट्यगृह : 2 सप्टेंबरपासून एलईडी दिव्यांनी उजळणार जंक्शन -नगराध्यक्ष रमण भोळे

भुसावळ- सत्ताधारी व विरोधकांच्या हमरी-तुमरीवरून नेहमीच गाजणारी पालिकेची सर्वसाधारणी सभा गुरुवारी शांततेत पार पडली तर शहर विकासाच्या तब्बल 39 विषयांना सत्ताधारी-विरोधकांनी एकमुखाने मंजुरी दिली. शहरात लवकरच बंदिस्त नाट्यगृहाची उभारणी करण्यात येणार असून 2 सप्टेंबरपासून शहरात सात वर्ष गॅरंटी असलेले एलईडी दिवे लावण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष प्रसंगी म्हणाले. गोपाळ नगरातील पालिकेच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते.

शहरातील रस्ते टाकणार कात : ट्रीमीक्स पद्धत्तीने कामे
पालिकेच्या सभेत शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे ट्रीमीक्स पद्धत्तीने कामे करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आले. त्यात बाजारपेठ पोलीस ठाणे ते यावल नाका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते वरणगाव रोड, राष्ट्रीय महामार्गापर्यंत तसेच गर्ल्स हायस्कूल ते मॉडर्न रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत, राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते आरपीडीरोड आदी रस्त्यांच्या ट्रीमीक्स पद्धत्तीने काम करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. शिावय रॉ वॉटर केंद्रासाठी 300 एच.पी.चा नवीन पंप खरेदी करणे, पालिकेच्या आरक्षण क्रमांक 143 जागेवर दुकान केंद्र व नगरपालिकेची प्रशासकीय ईमारत बांधणे, यावल रोड, जळगाव रोड, जामनेर रोडवरील तुटलेले सेंट्रल पोल काढून नवीन एलईडी पथदिवे लावणे, इलेक्ट्रीक पोलखरेदी करणे, शहरात सीसीटीव्ही बसवणे, पालिकेच्या मुख्याधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने बांधणे आदी 39 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

विरोधकांच्या वॉर्डातही करावीत कामे
जनाधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये कुठलीही विकासाची कामे होत नसल्याची तक्रार केली. विरोधकांच्या वॉर्डात कुठलीही कामे केली जात नसल्याने नागरीकांचा रोष पत्करावा लागतो शिवाय नागरीकांनी सुविधा मिळत नसल्याने कर का भरावा? असा प्रश्‍न उपस्थित केला. प्रभागात गेल्या अनेक महिन्यांपूसन एकच स्वच्छता कर्मचारी असल्याने कर्मचारी संख्या वाढवण्याची त्यांनी मागणी केली. नगराध्यक्ष रमण भोळे या प्रश्‍नावर म्हणाले की, सत्ताधारी असो वा विरोधक सर्वांच्या प्रभागात कामे केली जात आहे. हा प्रभाग सर्वाधिक मोठा असून सर्वप्रथम तुकाराम नगरातूनच अमृत योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली तर लवकरच या भागात रस्त्यांचीही कामे होतील त्यानंतर अन्य सुविधा पुरवल्या जातील, असे ते म्हणाले. शेख जाकीर सरदार यांनीही प्रभागातील गटारी निघत नसल्यासंदर्भात तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार केली. नगराध्यक्षांनी स्वच्छतेसंदर्भात संबंधिताना कडक सूचना करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.

नगरसेवक कोठारी संतप्त : आमदार सावकारेंनी केली कामे
प्रभाग 24 मध्ये विकासकामे झाली नाहीत, असे दुर्गेश ठाकूर यांनी म्हणतात सत्ताधारी नगरसेवक पिंटू कोठारी संतप्त झाले व त्यांनी आमदार संजय सावकारे यांनी या भागात सर्वाधिक दिड कोटी रुपयांची विकासकामे केली असल्याचे सांगितले. आधी कुठल्याही समस्यांचा अभ्यास करावा मगच सभागृहात बोलावे, असे त्यांनी ठाकूर यांना सुनावले. शहरातील सिंधी स्मशानभूमी, कब्रस्थान व यावल रोडवरील स्मशानभूमीत पालिकेने कर्मचार्‍याची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी मांडल्यानंतर सर्व नगरसेवकांनी या सूचनेचे स्वागत करीत अनुमोदन दिले. नगराध्यक्षांनी या संदर्भात लवकरच दखल घेण्याची ग्वाही दिली.

आधी जुन्या गाळ्यांचा लिलाव करावा -युवराज लोणारी
शहरात नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधावेत मात्र त्यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल व गोपाळ नगर व्यापारी संकुलातील रीकाम्या गाळ्यांचा लिलाव करून बेरोजगारांना हे गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक युवराज लोणारी यांनी मांडली शिवाय शहरात बंदिस्त नाट्यगृहाबाबतही त्यांनी सूचना मांडली. रीकाम्या गाळ्यांमुळे पालिकेच्या मालमत्तेची नासधूस होवून पुन्हा त्यावर खर्च करावा लागत असल्याची सूचना त्यांनी मांडली. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सूचनेचा विचार करण्याची ग्वाही देत लवकरच शहरात बंदिस्त नाट्यगृहाची उभारणी करणार असल्याचे सभागृहाला सांगितले.

शहराचा चौफेर विकास हाच ध्यास -नगराध्यक्ष
शहराच्या चौफेर विकासाचे विषय सभेत घेण्यात आले होते शिवाय सत्ताधारी व विरोधक असा कोणताही भेदभाव करण्यात आला नाही. शहराचा विकास हाच ध्यास असून एकमताने सर्व विषय मंजूर झाले ही एक चांगली सुरुवात आहे. आगामी काळात अधिक गतीने शहराच्या विकास होईल, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सभेनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.