भुसावळ पालिकेच्या सभेत स्वच्छता पुरस्कारावरून सत्ताधारी-विरोधक भिडले

0

अस्वच्छ पाणीपुरवठ्यास शहर अस्वच्छतेवर विरोधकांचे बोट : नगराध्यक्ष म्हणाले विरोधकांना पोटदुखीचा आजार

भुसावळ- पालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ‘स्वच्छता पुरस्कार मॅनेज करून मिळवल्याचा आरोप’ विरोधी नगरसेवकांनी केल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार वादंग सुरू असतानाच गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधार्‍यांनी 1 ते 21 विषय मंजूर-मजूर म्हणत सभागृहाबाहेर पाय काढल्याने अवघ्या सहा मिनिटात सभा गुंडाळण्यात आली. पालिकेच्या सर्वसाधारण सभा यापूर्वी शांततामय वातावरण झाल्याने शनिवारची सभाही शांततेत होईल, असे चित्र असताना घडलेल्या या प्रकाराने शहरवासीयांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. त्यातच विरोधकांनी नगराध्यक्षांनी शहर अस्वच्छतेबाबत व अशुद्ध पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारत गढूळ पाण्याच्या बाटल्या दाखवल्या तर नगराध्यक्षांनी विरोधकांनी पोटदुखीचा आजार जडल्याचे सांगितले.

अवघ्या सहा मिनिटात गुंडाळली सभा
शनिवारी सकाळी 11 वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपमुख्याधिकारी देशपांडे, गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते. विषय क्रमांक एक ते पाचचे वाचन झाल्यानंतर विषय क्रमांक सहा हा स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पालिकेला मिळालेला पुरस्कार मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठेवण्याचा असल्याने त्याचे वाचन सुरू असताना जनआधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यास आक्षेप नोंदवत पालिकेने हा पुरस्कार मॅनेज करून मिळवल्याचा आरोप करताच नगराध्यक्षांनी तीव्र संताप व्यक्त करीत ठाकूर यांची कान उघाडलणी केली तर अन्य सत्ताधारी नगरसेवकही याप्रकारानंतर चिडल्याने त्यांनी विरोधकांना धारेवर धरले. हा वाद सुरू असताना जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, जाकीर सरदार यांनी शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा मांडत नगराध्यक्षांना अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या बाटल्या दाखवत केवळ कागदोपत्री कामे सुरू असल्याचा व केवळ सत्ताधार्‍यांची बिले निघत असल्याचा आरोप केला. सत्ताधारी व विरोधी नगरसेवक समोरा-समोर आल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्यापूर्वीच सत्ताधार्‍यांनी सर्व विषयांना मंजुरी देत सभागृह सोडल्याने अवघ्या सहा मिनिटात सभा संपुष्टात आली.

विरोधकांना पोटदुखीचा आजार -नगराध्यक्ष
विरोधकांना पोटदुखीचा आजार झाला असून शहराचा विकास त्यांच्याकडून पाहिला जात नसल्याने ते असले उद्योग करीत असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. शहरात अमृत योजनेसह अद्यावत उद्याने, काँक्रिट रस्ते, उत्कृष्ट दर्जाचे एलईडी दिवे लावले जात असून शहर एकीकडे कात टाकत असताना विरोधक मात्र विकासाला आडकाठी आणत असून आम्ही त्यामुळे विचलीत होणार नाही, असे भोळे म्हणाले. विरोधक प्रत्येक कामाला मॅनेज तसेच भ्रष्टाचाराचा निरर्थक आरोप करीत असून जनतेला आमच्यावर विश्‍वास असल्याने अशा क्षुद्र आरोपांना आम्ही तेवढ्याच समर्थपणे उत्तर देवू, असेही त्यांनी सांगितले. अमृत योजनेचे शहरात काम बेकायदा सुरू आहे, अशी तक्रार माजी आमदारांनी केल्याचे सांगत योजनेसाठी आडकाठी आणण्याचा यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगत आतापर्यंत शंभर किलोमीटरच्या परीघात पाईप लाईन अंथरण्यात आली असून सुमारे 300 किलोमीटर पाईप लाईन अंथरली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षांनी देत शहराचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात अस्वच्छता, अशुद्ध पाण्याने नागरीक त्रस्त -उल्हास पगारे
शहरात सर्वत्र अस्वच्छता असून सर्वत्र केरकचरा साचला आहे. खडका रोड भागात तर सर्वाधिक अस्वच्छता असून नागरीकांना अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचे जनआधारचे गटनेता उल्हास पगारे म्हणाले. पालिकेत सत्ताधार्‍यांनी मनमानी चालवली असून मोठ्या प्रमाणावर बिले काढली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रभागात पाईप लाईन फुटली, पालिकेचे दुर्लक्ष -दुर्गेश ठाकूर
शहरात सर्वत्र अच्छता पसरली असून अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुठल्याही प्रभागात घंटागाडी जात नाही. खड्डे बुजवताना पिवळी माती टाकण्यात आली असून अमृत योजनेमुळे माझ्या प्रभागात पाईप लाईन फुटली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरीक अपघातात जखमी होत असल्याचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर म्हणाले.

या 21 शहर विकासाच्या विषयांना मंजुरी
सर्वसाधारण सभेत मोकाट गुरे पकडणार्‍या गो सेवकांना मानधन देणे, जळगाव रोडसह आरपीडी रोडवरील खड्डे बुजवणे, जुना सातारा भागात व्यायामशाळेचे काम करणे, प्रभाग क्रमांक 20 मध्ये प्रमोद नेमाडे वर्क शॉपजवळ बुस्टर पंपासाठी पत्र्याचे शेड व फाऊंडेशन तयार करणे, शहरातील विविध भागातील पथदिवे, ट्युब, फिक्चर, सोडीयम दिवे दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, नवीन इलेक्ट्रीक पोल खरेदी करणे आदी 21 विषयांना मंजुरी देण्यात आली.