तातडीच्या विशेष सभेत दुसर्यांदा सभागृहाने दिली मंजुरी ; 43 वर्षांनी होणार शहराची हद्दवाढ ; 50 ऐवजी आता 30 चौरस किलोमीटर क्षेत्राचा नवीन हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश ; कंडारी ग्रामपंचायत व गावठाणचाही भाग वगळला
भुसावळ- शहराची तब्बल 43 वर्षांनी होणार्या हद्दवाढीसाठी गत महिन्यात सभा घेण्यात येवून तसा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर करण्यात आला मात्र या प्रस्तावात 50 चौरस किलोमीटरचा परीसर समाविष्ट असल्याने हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता तर आता नव्याने 30 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आला असून या प्रस्तावाला शनिवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत सभागृहाने मंजुरी दिली. पीासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे अध्यक्षस्थानी होते.
महिनाभरात दुसर्यांदा प्रस्ताव
गत महिन्यात 4 फेब्रुवारी रोजी पालिकेने तातडीच्या सभेत सुमारे 50 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करून तो नगरविकास विभागाकडे स्वतः मुख्याधिकार्यांनी नेला होता मात्र वाढीव क्षेत्रात पालिकेला सोयी सुविधा पुरविता अशक्य असल्याने नगरविकास विभागाने सुधारीत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. परीणामी पुन्हा 30 चौरस किलोमिटर क्षेत्राचा सुधारीत प्रस्तावानंतर शनिवारच्या सभेत त्याला मंजुरी देण्यात आली नवीन प्रस्तावात सध्या केवळ शहराच्या लगतचा विस्तारीत भागाचा समावेश करण्यात आला असून पूर्वी दिलेल्या ग्रामपंचायतीच्या गावठाण व अन्य प्रांताच्या अख्यतारीत येणारा भाग तसेच कंडारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील भाग वगळण्यात आला असल्याची माहितीही विशेष तातडीच्या सभेत देण्यात आली.
या भागाचा हद्दवाढीत होणार समावेश
जळगाव रोडवरील नारायण नगर फेज 1 व दोन, गोदावरी नगर व संपूर्ण वाढीव भाग, जुगादेवी रस्त्यावरील माणक बाग, इंद्रप्रस्थ नगर व त्या शेजारील सर्व वाढीव भाग, वांजोळा रोडवरील प्रेरणा नगर, स्टार लॉन परिीसरातील भाग, शिवपूर कन्हाळे रोडवरील आरएमएस कॉलनी, चिकूचा मळा व परिसरातील कॉलनी, जामनेररोडवरील पंढरीनाथ नगरच्या दक्षिणेकडील सर्व भाग, खडका रोडवरील गावठाण वगळता दोन्ही बाजूंच्या सर्व विस्तारीत वस्त्या नवीन हद्दवाढीच्या प्रस्तावात समाविष्ट होणार आहेत.
अतिक्रमण थांबवण्याबाबत जनआधारचे निवेदन
पालिका हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रेल्वे अतिक्रमण करीत असून वारंवार तक्रारीनंतरही पालिकेकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचे निवेदन जनआधारने नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांना दिले. रेल्वेने 80 फुट नगरपालिकेचा रोड 25 फुट केला आणि रस्ता बंद करण्याची तयारी केला आहे. यामुळे आंबेडकर नगर, समता नगर, व्दारका नगर, नागसेन कॉलनी, कंडारी, ऑर्डनन्स फॅक्टरी आदींमधील रहिवाशांना त्रास होईल. रस्ते बंद करण्यासाठी विरोध असल्याची भुमिका गटनेते उल्हास पगारे व नगरसेवकांनी निवेदनाव्दारे व्यक्त केली.