भुसावळ पालिकेतील स्वच्छता कर्मचार्‍यांना न्याय द्या

0

सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांना साकडे

भुसावळ :- भुसावळ पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना कुठल्याही सुविधा नाही, सफाई कर्मचार्‍यांची संख्या अल्प आहे, नियमित त्यांना वेतन दिले जात नाही यासह अन्य समस्या सोडवण्याबाबत राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्ष रामुजी पवार यांना नगरपालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी भुसावळ दौर्‍याप्रसंगी साकडे घातले. पालिकेच्या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देवू व जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर निश्‍चित कारवाई करू, असे आश्‍वासन पवार यांनी प्रसंगी दिले.

लोकसंख्या वाढली, सफाई कर्मचारी ‘जैसे थे’
खरारे यांच्या निवेदनानुसार एक हजार लोकसंख्येमागे पाच सफाई कामगारांची आवश्यकता आहे मात्र भुसावळ शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली असली तरी सफाई कर्मचारी मात्र अल्पच आहेत. सफाई कर्मचार्‍याला एक हजार 500 फुट गटार साफ करण्याचे आदेश असले तरी त्याच्याकडून जास्त काम करून घेतले जाते, पालिका कर्मचार्‍यांचा नियमित पगार होत नाही, अनुदान प्राप्त झाल्यानंतरच पगार होतो, लाड समितीच्या शिफारसीनुसार वारसाहक्काप्रमाणे 30 दिवसांच्या आत नेमणूक करणे बंधनकारक आहे मात्र भुसावळ पालिकेत तसे होत नाही, सफाई कर्मचार्‍यांना घाणभत्ता, गणवेश, धुलाई भत्त्याचा पालिकेला विसर पडला आहे यासह अन्य विविध समस्या सोडवण्याबाबत पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली.