भुसावळ । पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संपुर्ण विषयांचे वाचन न करता आवाजी बहुमताने 121 विषयांना मंजूरी देण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनाधार पार्टीच्या तीन नगरसेवकांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेत गोंधळानंतर मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक प्रा. सुनिल नेवे यांसह भाजपा नगरसेवकांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात धाव घेऊन घडल्या प्रकाराची पोलीसांनी माहिती दिली. यानंतर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामकाज सुरु असताना जनाधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रविंद्र सपकाळे व संतोष चौधरी (दाढी) यांनी मुख्याधिकार्यांचा हात पकडून धक्काबुक्की केल्याची फिर्याद मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी दिली. यावरुन शासकीय कामकाजात अडथळा व मुख्याधिकार्यांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहे.
जनआधारचीही तक्रार
दरम्यान, जनआधार पक्षाच्या तीन नगरसेवकांविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर या पक्षाच्या सदस्यांनीही भाजपविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवक रविंद्र सपकाळे, साधना भालेराव व पुष्पा सोनवणे यांना नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लोणारी व मुख्याधिकारी बाविस्कर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार डिवायएसपी निलोत्पल यांच्याकडे दिली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर जनआधारच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
योग्य ती कारवाई होणार
पालिकेत झालेल्या गोंधळासंदर्भात मुख्याधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर सभागृहातील कामकाजाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून यात या तीनही नगरसेवकांनी मुख्याधिकार्यांचा हात पकडल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी सांगितले आहे.