अशुद्ध व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजी
भुसावळ- शहरात नगरपालीकेच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा गढूळ व अशुद्ध स्वरूपाचा होत आहे.यामूळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नगरपालीका शहरवासीयांना अशुद्ध व गढूळ स्वरूपाचे पाणी पाजत असून नगरपालीकेत मात्र शुद्ध पाण्याच्या जारचा वापर केला जात आहे.यामूळे शहरवासीयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराला तापीनदीपात्रातील पाण्याचा जलशुद्धीकरण यंत्राद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.मात्र जलशुद्धीकरण केंद्र कालबाह्य झाल्याने शहराला गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे.तापीनदीला पुर आल्यावर शहराला मोठ्या प्रमाणात गाळ मिश्रीत गढुळ पाण्याचा पुरवठा होतो. मात्र सद्यस्थितीत तापीनदीचा पुर ओसरला असूनही शहराच्या काही भागात गढुळ स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे.तसेच शहराच्या विविध भागात अशुद्ध व गढूळ पाणी होत असतांना पालीकेतील कर्मचारी,अधिकारी व पदाधिकारी मात्र शुद्ध पाण्याच्या जार मधील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करीत आहेत.तर काही दिवसापुर्वी बहूजन महासंघाने आंदोलन करीत पदाधिकार्यांना गढूळ पाणी पिण्यास भाग पाडले होते.मात्र यानंतरही पालीका प्रशासनाने नागरीकांच्या या समस्येची दखल घेतली नसल्याचे दिसुन येत आहे.
नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न
शहरातील विविध भागातील जलवाहीनीला गळती लागली असून नागरीकांना अशुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे.परीणामी नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.मात्र पालीका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीयांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.यामूळे पालीका प्रशासनाने उपाय योजना करून शहरवासीयांना शुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा करणे गरजेचे झाले आहे.
नागरीकांनाही घ्यावा लागतोय पाण्याचा जारचा आधार
पालीका प्रशासनाकडून शहरवासीयांना गढुळ व अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याने अनेक व्यापारीवर्ग व नागरीक आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाण्याच्या जारचा वापर करतांना दिसून येत आहे.यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने शहरवासीयांचे अमृत योजनेच्या कामाकडे लक्ष लागले आहे.तर पालीका प्रशासनानेही अमृत योजनेच्या कामाला गती देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जारचा व्यवसाय जोरात
शहरात होणारा पाणीपुरवठा अशुद्ध स्वरूपाचा होत असल्याने शहरातील नागरीक,शासकीय कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी व व्यापारी वर्गाला पाण्याचा जारचा आधार घ्यावा लागत आहे.यामूळे शहरात पाण्याचा जारचा व्यवसाय जोरात सुरू आहे.मात्र शुद्ध पाण्याच्या जारच्या नावाखाली जार विक्रेते अन्न प्रशासन विभागाची कुठल्याही प्रकारे रीतसर परवानगी न घेता थंड पाण्याच्या जारची विक्री करीत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.