भुसावळ पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणाचे 133 वे रॅकींग

0

सुधारणांची गरज ; नॅशनल रॅकींगमध्ये शंभर शहरात समावेश नाही

भुसावळ- सन 2017 च्या स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांपैकी 433 क्रमांकावर भुसावळचा क्रमांक आल्यानंतर देशभरातील दुसर्‍या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून भुसावळची गणना झाली होती भाजपाची पालिकेवर सत्ता आल्यानंतर अनेक आमुलाग्र बदल झाले तर गतवर्षी देशात सर्वाधिक जलद गतीने स्वच्छ होणारे शहर म्हणून फास्टेट मुव्हर्स अवॉर्ड मिळून देशात 69 व्या क्रमांकावर शहराची रँकींग पोहोचली तर आता केंद्र शासनाच्या 425 अमृत शहरांपैकी भुसावळ शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये 133 वा क्रमांक मिळाला आहे. नॅशनल रँकींगच्या टॉप 100 शहरात भुसावळ शहराचा समावेश नसल्याचे सांगण्यात आले.

रॅकींग पुन्हा घसरली
अमृत योजनेत सहभाग असलेल्या 425 शहरांपैकी भुसावळला 133 व्या क्रमांकाची रँकींग मिळाल्याने गत वर्षाच्या तुलनेत शहराची स्वच्छ सर्वेक्षणाची कामगिरी घसरली आहे. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता अ‍ॅप व अन्य कामांमध्ये कामगिरी दमदार राहिली नसल्याने पालिकेचा 133 वा क्रमांक आल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या माध्यमातून अमृतच्या निकषात महत्वपूर्ण ठरणार्‍या काही उपाययोजना अपूर्ण राहिल्याने क्रमांक 133 वर पोहोचला असून आता यापुढे व्यापक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

स्वच्छतेच्या प्रोजेक्टची कागदोपत्री पूर्तता -नगराध्यक्ष
भुसावळ शहराची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत शून्यापासून सुुरवात केली. पहिल्या सर्वेक्षणात चांगली मजल मारली होती व त्यासाठी पुरस्कारही मिळवला होता. या वर्षभरात भविष्यातील स्वच्छतेच्या प्रोजेक्टची कागदोपत्री पूर्तता करून घेण्यात आली आहे आणि आता प्रत्यक्षात त्यानुसार काम सुरू असून याचा फायदा पुढील काळात सर्वेक्षणात आपल्याला कायम मिळत राहणार आहे. घन कचरा प्रकल्पा, बायोमायनिंग प्रकल्प, सिव्हेज वॉटर या प्रकल्पांची सुरुवात ही आता होत असल्याची नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.