भुसावळ- पुणे एक्सप्रेस पूर्वसूचना न देताच दौंडला थांबली

0

पुणे: भुसावळ येथून पुण्याला जाणारी हुतात्मा एक्सप्रेस पुण्याला न जाता दौंड येथे पोहचल्यावर कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे प्रशासनाने दौंड येथेच अचानक गाडी टर्मिनेट केली आहे. ज्या प्रवाशांनी पुण्यापर्यंत आरक्षीत तिकीट घेतलेले आहे त्यांनी आता दौंड ते पुणे प्रवासासाठी पुन्हा वेगळे तिकीट घ्यावे लागेल. प्लेटफार्म वरुन जिना चढून बाहेर जाऊन तिकीटाच्या रांगेत उभे राहून पुन्हा नव्याने तिकीटाचा प्रवाशांना भुर्दंड बसला आहे.

याबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव स्टेशनवर गाडी येण्याआधी, सदर गाडी फक्त दौंड पर्यंतच जाणार आहे अशी रेल्वे प्रशासनाने का नाही अनौंसमेंट केली ? मुळात सदर हुतात्मा एक्सप्रेस भुसावळ मनमाड कल्याण पनवेल मार्गे पुण्यात पोहोचते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक कारणामुळे ही गाडी मनमाड दौंड मार्गे पुण्यात पोहोचते. आज ही गाडी अचानक दौंड येथे टर्मिनेट केल्या मुळे महिला, वृद्ध प्रवासी यांचे अतोनात हाल झाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार रक्षा खडसे तसेच उन्मेष पाटील तसेच रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीचे जळगाव जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत असलेले सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी रेल्वेच्या या महंमद तुघलकी कारभाराची चौकशी करून असे प्रकार पुन्हा होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाला बाध्य करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.