भुसावळ पुन्हा खुनाने हादरले

0

गुन्हेगारांची दहशत कायम : रॉडने हल्ला करून केला तरुणाचा खून

भुसावळ : भुसावळ पुन्हा खुनाने हादरले असून एका तरुणाचा किरकोळ वादातून खून झाल्याने भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. मो.शेख जाकीर (पंचशीलशील नगर, भुसावळ) असे मयताचे नाव असल्याचे समजते. चार ते पाच संशयीतांनी वादातून रॉडने हल्ला करून या तरुणाचा खून केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर भुसावळातील गुन्हेेगारी पुन्हा चर्चेत आली असून हल्लेखोरांचा भुसावळ बाजारपेठ पोलिस शोध घेत आहेत.

भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत
भुसावळात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून पोलिसांना गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असल्याने सर्वसामान्य नागरीकांमध्ये चीड निर्माण होत आहे. पोलिसांच्या छुप्या आशीर्वादाने भुसावळात सात वाजेनंतरही सुरू असलेली दारू दुकाने तसेच महामार्गावरील ढाब्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली बेकायदा दारू विक्रीसह रात्री उशिरापर्यंत ढाबे सुरू असल्याने गुन्हेगारांना शहरात आयतेच रान मोकळे झाले आहे. अप्रिय घटनेनंतर अपवादात्मक शहर व बाजारपेठ व तालुका पोलिस हद्दीत कारवाई होत असल्याने अप्रिय घटनांचा आलेख शहरात कायम आहे. शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील ढाबे, हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे सर्वसामान्य नागरीकांची ओरड आहे. या गंभीर प्रकाराबाबत वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जळगाव विभागाचे सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याशी संपर्क साधला असता नियम मोडणार्‍यांवर यापुढे धडक कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले तर आता पोलिस प्रशासनाकडून कारवाई होते वा नाही? याकडे लक्ष लागले आहे.