जळगाव। भुसावळात झालेल्या गोळीबारात दोन भावंडे जखमी होवून गोळीबारानंतर संशयितांनी तीन दुचाकींवरून पळ काढला होता. दरम्यान, संशयित हे जळगावात असल्याची माहिती भुसावळ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रविवारी रात्रीच जळगाव गाठत संशयितांचा पहाटेपर्यंत शोध घेतला. मात्र, संशयित पहाटेच जळगावातूनही फरार झाल्याचे पोलिसांना कळाले. जखमींना देखील जळगावातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जखमी भावंडांवर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू
भुसावळातील भारतनगरात रात्री 11 वाजता तीन दुचाकींवर ट्रिपलसीट नऊ युवक आले. त्यांनी गोंधळ घालत पिस्तुलातून दोन राउंड हवेत गोळीबार केला. त्यानंतर ते पवननगरात आले. या ठिकाणी मोकळ्या जागेत त्यांनी सुमीत किशोर झांबरे (वय 20) निखिल किशोर झांबरे (वय 24, रा. जुना सतारे, भुसावळ) यांना मारहाण केली. त्यात एकाच्या पायाला गोळी लागली तर एकाच्या पायावर धारधार शस्त्राने वार केला. त्यामुळे दोन्ही भावंडे जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. परंतू गोळीबार झाल्यानंतर संशयित हे दुचाक्यांवरून फरार झाले होते. रात्रीच जखमी भावंडांना जळगावातील भंगाळे हॉस्पीटल येथे उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान, संशयित हे जळगावाकडे पळाले असल्याची गुप्त माहिती भुसावळ पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पाच ते सहा जणांची भुसावळ पोलिसांचे पथक रविवारी रात्रीच जळगावात दाखल होवून त्यांनी संपूर्ण परिसरात संशयितांचा शोध पहाटे पर्यंत घेतला. मात्र, संशयित हे पहाटे 5 वाजेच्या सुमारास जळगावातून अन्य ठिकाणी पळाले असल्याची माहित पथकाला मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पथक संशयितांचा शोध घेत होती.