भुसावळ पोलीस स्थानकात दोन गटात फ्रिस्टाईल

0

भुसावळ । येथील शहर पोलीस स्थानका बाहेर दोन गटात जुन्या वादावरुन हाणामारी झाली. हा वाद समोरील शहर पोलीस स्थानकात गेला. याठिकाणी कर्तव्यावर महिला कर्मचारी असल्यामुळे त्यांना न जुमानता थेट पोलीस स्थानकातच दोन्ही गटातील कार्यकर्ते आपसात भिडले. मात्र महिला कर्मचार्यांनी हि बाब लागलीच वरिष्ठांना कळविल्याने पोलीस उपअधिक्षक निलोत्पल यांनी पोलीस स्थानकात येत दोन्ही गटातील टवाळखोरांना चांगलाच चोप देऊन त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयासमोर असलेल्या फुटपाथवर दोन गटात वाद निर्माण झाला.

हा वाद आजी- माजी नगरसेविका पतीच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊन दोन्ही बाजूच्या टवाळखोरांनी थेट शहर पोलीस स्थानकात घुसून ऊसाच्या पेर्याने एकमेकांना मारहाण केली. यावेळी सर्व कर्मचारी हे पथसंचलनात सहभागी झाल्यामुळे पोलीस स्थानकात केवळ एक महिला ठाणे अंमलदार व एक पुरुष कर्मचारी असे दोनच कर्मचारी होते. या वादात महिला कर्मचार्यांना देखील धक्काबुक्की झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी निलोत्पल यांनी पोलीस स्थानकात धाव घेऊन दोन्ही गटातील टवाळखोरांना चांगलाच चोप दिला. यानंतर निलोत्पल हे येथे संचलनासाठी रवाना झाले. मात्र दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलीस स्थानकात जमा करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.