भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील लाचखोर अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात
दहा हजारांची लाच मागणी भोवली : नंदुरबार एसीबीच्या कारवाईने भुसावळात खळबळ
भुसावळ : प्लॉट एन.ए.करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्रतिभा मच्छींद्र लोहार (40) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने मंगळवार, 5 रोजी दुपारी अटक केल्याने प्रांताधिकारी कार्यालयातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नंदुरबार एसीबीकडून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
दहा हजारांची लाच मागणी भोवली
भुसावळातील एका तक्रारदाराने प्लॉट एन.ए.करण्यासाठी प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयात सादर केले होते. काम होण्यासाठी संशयीत आरोपी प्रतिभा लोहार यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात थेट नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचला मात्र 17 सप्टेंबर 2021 रोजी पथक आल्यानंतर लोहार यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने मंगळवार, 5 रोजी लोहार यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या निरीक्षक माधवी वाघ व त्यांच्या सहकार्यांनी केली. दरम्यान, हा गुन्हा अधिक तपासासाठी आता जळगाव एसीबीकडे सोपवण्यात येणार आहे.