भुसावळ प्रांताधिकार्‍यांसह तहसीलदारांना जिल्हाधिकार्‍यांची नोटीस

भुसावळ : शहरातील अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रारी झाल्यानंतर जिल्हा गौण खनिज अधिकार्‍यांनी शहरात येवून 16 ठिकाणी तपासणी करीत तब्बल 500 ब्रास वाळूचा पंचनामा केला होता मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ही बाब गांभीर्याने घेत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणेंसह तहसीलदार दीपक धीवरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत तीन दिवसात खुलासा मागितला आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर भुसावळ महसूल प्रशासनाने वाळू साठ्यांचे पंचनामे केले होते.

500 ब्रासचा साठा आढळला
गुरुवार, 23 रोजी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रारी आल्यानंतर जिल्हास्तरीय पथकाने गुरुवार, 23 जून रोजी शहरातील विविध कॉलन्यांमध्ये तपासणी केली. त्यात 16 ठिकाणी अंदाजे 500 ब्रास वाळूचे साठे आढळले होते. स्थानिक प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याची बाबही यानंतर समोर आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना नोटीस सोमवारी नोटीस बजावली आहे. कर्तव्यात केलेल्या दिरंगाईमुळे आपल्या विरूध्द प्रशासकीय स्वरूपाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत नोटिस मिळाल्यापासून तीन दिवसात खुलासे सादर करण्याचे बजावण्यात आले असून खुलासा न आल्यास काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरून प्रशासकीय स्वरूपाची कारवाई करण्याचे प्रस्तावीत करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद आहे. दरम्यान, शहरात अद्यापही अवैधरीत्या वाळू वाहतूक कायम असून महसूल व पोलिस प्रशासन हातावर हात ठेवून असल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.