भुसावळ बसस्थानकाचे पूर्व सुचनेविनाच स्थलांतर ; प्रवाशांमधून संताप

0

रेल्वे व एसटी प्रशासनाच्या उफराटा कारभाराविषयी टिका ; झाडाच्या फांद्या तोडण्याचे पावसाळ्यात सूचले शहानपण

भुसावळ- पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पावसाळा सुरू झाल्यानंतर करावयाचे लक्षात आल्याने रेल्वे प्रशासनाने बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गुरुवारी सकाळी तब्बल पाच तास रस्ता बंद ठेवल्याने बसस्थानकाचे तात्पुरता स्थलांतर करावे लागले मात्र याची एसटी प्रवाशांसह नागरीकांना कुठलीही माहिती कळवण्याचे सौजन्य एसटी व रेल्वे प्रशासनाने न दाखवल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करीत हाल सोसावे लागले. बाहेर गावाहून येणार्‍या बस चालकांची या प्रकारामुळे चांगलीच भंबेरी उडाली तर बसस्थानकात तास न् तास वाट पाहूनही बसेस का येत नाही? याचे कोडे पडलेल्या प्रवाशांना खरी बाब लक्षात आल्यानंतर त्यांना डी.एस.ग्राऊंड गाठेपर्यंत चांगलीच त्रेधा-तिरपीट सोसावी लागली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला मात्र यश आले.

बसस्थानकाचे तात्पुरता स्थलांतर
बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील माारोतीच्या मंदीराजवळील झाडाच्या फांद्यांचा वायरींगला अडसर येत असल्याने व त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त होत असल्याने झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवारी बसस्थानकाकडे जाणारा मार्ग पाच तासांसाठी वाहतूकीला बंद ठेवल्याने बसस्थानकाचे तात्पुरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राऊंड) स्थलांतर करण्यात आले होते. मुळात रेल्वे प्रशासनासह एस.टी.प्रशासनाने हे काम करण्यापूर्वी माध्यमांतून प्रवाशांना सूचित करणे गरजेचे असताना तसे न झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागला.

एस.टी.प्रशासनाला सायंकाळी पत्र
गुरूवारी सकाळी सात ते 12 असे पाच तास हा मार्ग बंद ठेवला जाणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने एस.टी.प्रशासनाला दिले असलेतरी तरी ते बुधवारी सायंकाळी सात वाजता देण्यात आल्याचे आगारप्रमुख हरीष भोई म्हणाले. आपण दिवसभर बैठकीत व्यस्त असल्याने आपल्याला त्याबाबत सूचित करता आले नाही मात्र रेल्वे प्रशासनाने ही बाब या आधीच माध्यमांना कळवायला हवी होती, असेही ते म्हणाले. दरम्यान, गुरूवारी सकाळी सात वाजेपासून वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू केले. यामुळे हा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता त्यामुळे व्हीएम वार्डातून वाहतूक वळविण्यात आली होती. दरम्यान, बसस्थानकाच्या स्थलांतरामुळे रीक्षा व्यावसायीकांची चांदी झाली तर बस नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी सुध्दा चांगली कमाई केली.

चार मार्गावरील बसेस धावल्या स्थलांतरीत बसस्थानकावरून
रावेर, यावल, चोपडा, जळगाव या मार्गावरील सर्वच बसेस या स्थलांतरीत स्थानकावर येत व जात होत्या तर रेल्वे स्थानकाजवळील बसस्थानकावरून मुक्ताईनगर व बोदवड येथील बसेस सोडण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य गावांच्या बसेस स्थलांतरीत स्थानकावरून सोडल्या जात होत्या. यामुळे गांधी पुतळ्याकडे प्रवाशांची गर्दी झाली होती. जळगावकडून येणार्‍या व जाणार्‍या बसेस या गांधी पुतळ्याकडून थेट गेल्यात. मुक्ताईनगरकडून येणार्‍या लांब पल्यांच्या बसेस नाहाटा चौफुलीवरून पुढे वाय पाँईटवरून स्थलांतरीत बसस्थानकात आल्यात, यामुळे कीमान पाच कीलोमीटरचा फेरा बसगाड्यांना पडला.