भुसावळ। येथील बसस्थानक आगारात खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचत असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच घाणीचे साम्राज्य, बंद लाईट यामुळे गैरसोय होत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असताना रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी याकडे लक्ष देऊन दूरध्वनीवरुन आगार व्यवस्थापकांना धारेवर धरले व समस्या सोडविण्याबाबत परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डबक्यात पाय घसरुन प्रवाशांना ईजा होण्याची भिती
येथील बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मात्र आगार प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून बसस्थानकाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी या पाण्यातूनच वाट धरावी लागत असून पाण्यामुळे पाय घसरुन पडल्यास प्रवाशांना ईजा होऊ शकते. मात्र आगार प्रशासनातर्फे हे खड्डे बुजविण्यात येत नाही.
दुर्गंधीमुळे आरोग्यास बाधा
बसस्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नियमितपणे साफसफाई होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी फैलावत आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा कुजला असून दुर्गंधी सहन होत नसल्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. यामुळे प्रवाशांचे आरोग्यास बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर राजीनामा द्यावा
समाज माध्यमांवर याबाबत चर्चा सुरु असून येथील आमदारांपेक्षा रावेरच्या आमदारांनी या समस्यांबद्दल दखल घेतल्याने त्यांचे आभार मानन्याची आवश्यकता आहे. शहरातील लोकप्रतिनिधी मुंग गिळून गप्प बसले असल्यामुळे प्रवाशांसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या भेडसावणार्या अडचणींची जबाबदारी स्विकारुन त्यांनी रितसर राजीनामा देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस विवेक नरवाडे यांनी केली आहे.