भुसावळ बसस्थानकात शुुकशुकाट ; दुसर्‍या दिवशी 20 फेर्‍या रद्द

0

भुसावळ- भुसावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक साहित्याचे ने-आण करण्यासाठी प्रशासनाने 32 बसेससह 86 जीप-कार वाहने अधिग्रहीत केल्यानंतर सोमवारी भुसावळ आगाराने तब्बल 96 फेर्‍या पहिल्या दिवशी रद्द केल्या होत्या शिवाय मतदानाच्या दिवशी मंगळवारीदेखील सुमारे 20 पेक्षा अधिक फेर्‍या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक साहित्य स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्यानंतर बसेस बसस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीची संख्या पाहून तसेच मुक्कामाच्या ठिकाणी जाणार्‍या गाड्यांचे नियोजन पाहून बसेस सोडल्या जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दिवसभर बसस्थानकावर शुकशुकाट
एरव्ही प्रवाशांनी गजबजलेल्या भुसावळ बसस्थानकावर मंगळवारी दुपारनंतर प्रवाशांची फारशी वर्दळ दिसून आली नाही. सोमवारी भुसावळ आगाराने ग्रामीण भागातील मेहकर, वराडसिम, गोजोरा, जुनोना, तपतकठोरा, डोंगरकठोरा आदी भागातील तब्बल 96 फेर्‍या रद्द केल्या होत्या तर दुसर्‍या दिवशी मंगळवारीदेखील यातील 20 फेर्‍या रद्द करण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. बुधवारी याबाबत अधिकृत माहिती देवून किती फेर्‍या रद्द होवून नुकसान झाले याबाबत माहिती देता येईल, असे बसस्थानकावरील सूत्रांकडून सांगण्यात आले.