भुसावळ बसस्थानक परीसरात पाण्याचे डबके वाहनधारकांना ठरताहेत त्रासदायक

0

बसस्थानक चौकातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याची मागणी

भुसावळ- भुसावळ बसस्थानक व परीसरात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने या भागातून मार्गक्रमण करणार्‍या वाहनधारकांना उंटावरील स्वारीचा अनुभव येत आहे तसेच या परीसरात दुपारी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

प्रवाशांना करावी लागतेय तारेवरची कसरत
शहरातील इतर रस्त्यावरील खड्ड्यांप्रमाणेच बसस्थानकावर व या परीसरात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. बसस्थानकावर तर अक्षरक्ष: पावसाच्या पाण्याचे तळे साचत असल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करीत इच्छीत बसकडे धाव घ्यावी लागते तसेच बसस्थानक परीसरातच मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण वरणगाव, पंधरा बंगला, शिवाजीनगर, जाममोहल्ला व इतर विस्तारीत भागाकडे जाणार्‍या वाहनधारकांना उंटावरील स्वारीचा अनुभव येत आहे. यामुळे पालिका प्रशासनाने पुढाकार घेवून या मार्गावरील खड्डयांची तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे. या भागात दुपारी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

अवैध वाहतुकीचा विळखा
बसस्थानक चौकात मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव व यावल भागाकडे धावणार्‍या अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्‍या वाहनांचा गराडा पडलेला असतो. या वाहनामुळेही या भागातील वाहतूक कोंडीला हातभार लागतो मात्र या परीसरात नियुक्त केले जात असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून केवळ नावालाच कारवाई होत असल्याने वाहनधारकांचे चांगलेच फावले आहे. यामुळे वरीष्ठ अधिकार्‍यांनी या भागातील वाहतूक कोंडीकडे जातीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बसस्थानकावर अस्वच्छता
पावसाळ्याचे दिवस असल्याने बसस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे मात्र अशा परीस्थितीत बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. बसस्थानकावरील बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकांची दुरवस्था झाली असून बसस्थानकावर अस्वच्छतेने दुर्गंधी पसरते. यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करीत बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.